अमृतसर –रविवारी अमृतसरमधील राजासांसी येथील निरंकारी भवनात सत्संग सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला होता. ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी एका स्थानिक तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशीवेळी त्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या मदतीने हा हल्ला घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्यामागे खलिस्तानी दहशतवादी हरमीत सिंह हॅपी उर्फ पीएचडी याचा हात असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये लपलेल्या हॅपी उर्फ पीएचडीने स्थानिक तरुणांच्या मदतीना हा ग्रेनेड हल्ला घडवून आणला होता.
या हल्ल्याच्या तपासादरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी दोन्ही आरोपी तरुणांची ओळख पटवून त्यापैकी एकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव बिक्रमजीत सिंह असून, तो धालीवाल गावातील रहिवासी आहे. अन्य आरोपीचे नाव अवतार सिंह असून, त्यालाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली. दहशतवादी आता काश्मीरमधून पंजाबच्या दिशेने पावले वळवत आहेत. मात्र आम्ही त्यांना रोखू, असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.