निराधार आजी-आजोबांसह वाढदिवस साजरा…!

0

चिंचवडमधील अंशुलचा आदर्श उपक्रम

दापोडी : वाढदिवसासाठी होणार्‍या केक, पार्टी, डेकोरेशन या सर्व अनाठायी खर्चिक गोष्टींना नाकारून चिंचवड येथील विद्यार्थ्याने आपला 12 वा वाढदिवस निराधार आजी-आजोबांसह साजरा केला. त्यांचे आशिर्वाद घेऊन त्यांच्यासाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.
अंशुल जगताप असे या विदयार्थ्याचे नाव असून तो सध्या आठवी इयत्तेत शिकत आहे. सध्या मुलांमध्ये सामाजिक भान व संवेदना हरपत चालल्याची ओरड सुरू आहे.

मोबाईल युगाची भुरळ घातलेल्या नव्या पिढीतील मुलांना व युवकांना अंशुलने आपल्या विचारातून आदर्श घालून दिला आहे. पोटासाठी भीक मागून व वाटेल त्या थराला जाणार्‍या लोकांची दैनावस्था पाहून अस्वस्थ होणार्‍या अंशुलने आपल्या आई-बाबांना आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान करण्यास सांगितले. त्यानुसार रूपीनगर येथील किनारा वृद्धाश्रम व मतिमंद केंद्रामधील आजी-आजोबांना अन्नदान करण्यात आले. लहान वयातील मुलांच्या या संवेदनशीलवृत्तीचे वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रिती वैद्य यांनी कौतुक केले.