निरामय आरोग्यासाठी उद्या धावणार भुसावळकर

0

‘रन भुसावळ रन’ स्पर्धेसाठी 1600 स्पर्धकांची नोंदणी ; विजेत्यांना आकर्षक बक्षीस

भुसावळ- जिल्हा पोलिस दल व सिद्धीविनायक ग्रुप, बियाणी ग्रुप, गोदावरी फाऊंडेशन, आमदार संजय सावकारे यांच्या सहकार्याने निरामय आरोग्यासाठी रन भुसावळ रन स्पर्धेचे रविवार, 13 रोजी आयोजन करण्यात आले आहे. तीन गटात होणार्‍या या स्पर्धेला शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पहाटे सहा वाजता प्रारंभ होणार आहे. दहा किलोमीटरसाठी पहाटे सहा वाजता तर पाच किलोमीटरसाठी 6.45 व तीन किलोमीटर अंतरासाठी 7.15 वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल.

यांची राहणार प्रमुख उपस्थिती
स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, डीआरएम आर.के.यादव, कर्नल सुनील कदम, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके, डीवायएसपी गजानन राठोड, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, उद्योजक मनोज बियाणी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

लव्ह भुसावळ सेल्फि पॉईंटचे आकर्षण
स्पर्धेत आरएफआयडी तंत्राचा वापर करण्यात येणार असून त्याद्वारे स्पर्धकाने किती वेळेत अंतर पार केले हे कळून त्यानंतर विजेता घोषित होणार आहे. यंदा स्पर्धेसाठी खास सेल्फि पॉईंट निर्माण करण्यात आले असून लव्ह भुसावळसह छोटा भीम, चार्लि चॅप्लीनचे स्पर्धकांना सेल्फि काढण्यासाठी आकर्षण राहणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला अग्रवाल ग्रुपतर्फे झुम्बा डान्स सादर होईल तसेच पंजाबी ढोलचेही आकर्षण राहणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण एक हजार 600 स्पर्धकांनी नोंदणी केल्याचे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले.