बारामती । निरा नदीच्या पात्रातून दररोज हाजारो ब्रास वाळू उपसा होताना दिसत आहे. बेकायदेशीरपणे ही वाळू नेली जात असल्याचे समजते. असे असताना महसूल प्रशासन मात्र, याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. कोणतीही गंभीर स्वरुपाची कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये अंतोचाषे वातावरण पसरले आहे.
बारामती, इंदापूर, माळशिरस या तालुक्यांतून निरा नदी जाते. त्यामुळे या नदीची जबाबदारी तिन्ही तालुक्यातील तहसिलदारांची आहे. सोनगाव येथे करहा व निरा या दोन नद्यांचा संगम होतो. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या हा परिसर महत्त्वाचा आहे. सोनगाव येथील सोमेश्वराचे प्रसिध्द मंदिर असून पर्यटनाच्या दृष्टीने मंदिराचा परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. मात्र वाळू उपशामुळे या कामांनाही धोका पोहचत आहे. सोमेश्वर मंदिराच्या पश्चिम बाजुने निरा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. तर पुर्व बाजूस इंदापूर, माळशिरस या तालुक्यांमध्ये वाळू उपशामुळे नदीची वाताहत झाली आहे. वाळू उपशामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढून सोमेश्वर मंदिराला धोका वाढला आहे. मात्र याकडे गांर्भीयाने पाहिले जात नाही.
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
सराटी, चाकाटी, बोराटवाडी, रासकरमळा, निरवांगी, निमसाखर, खुरोची, चिखली, कळम, कुरवली, तावशी, उध्दट ही नदीकाठची गावे इंदापूर तालुक्याच्या महसूल हद्दीत येतात. तर कळंबोली, बांगार्डे, पळसमंडळ ही गावे माळशिरस तालुक्याच्या महसूल कार्यक्षेत्रात येतात. या सर्व गावांना निरा नदी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वरदायिनी ठरली आहे. या नदीचे पर्यावरणीय दृष्टया अतिशय नुकसान होत असून शेतकर्यांसाठी ते धोकादायक आहे. तरीही वाळूतस्करांना विरोध होताना दिसत नाही. शेतकर्यांनाच आता यासाठी आंदोलन करावे लागेल असे या भागातील शेतकर्यांनी सांगितले.
बंधार्यांना धोका
गेल्या चार वर्षापासून या भागातील शेतकर्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागले आहे. निरा नदीवर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे घालून पाणी अडविण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत. परंतु वाळू उपशामुळे या बंधार्यांनाही धोका निर्माण झाला आहे. महसूल प्रशासनाकडून जुजबी स्वरूपाची कारवाई केली जाते. विशेष म्हणजे माळशिरस तालुक्यात अनेकवेळा गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी इंदापूर व बारामती तालुक्यातील कारवाईबाबत टाळाटाळ केल्याचे चित्र दिसते.
तक्रारदारांना धमकी
खबर्यांचा वापर करून वाळू तस्कर अहोरात्र वाळू उपसा करतात. रात्रीच्या वेळी तर नदीकाठावर वाळूतस्करांचे साम्राज्य असते. तक्रारी करणार्या शेतकर्यांना धमकी देणे तर हे नित्याचेच प्रकार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात मोठाले खड्डे तयार झालेले दिसतात.
पुलांना धोका
सातारा जिल्हा व पुणे जिल्हा यांना दळणवळणाच्या दृष्टीने जोडण्यासाठी या 40 किमीच्या परिसरात सहा पूल उभारण्यात आलेले आहेत. या पुलांनाही वाळू उपशामुळे धोका तयार झाला. या पुलांचा वापर वाळू तस्कर जिल्हा हद्द बदलण्यासाठी व कारवाई टाळण्यासाठी करताना दिसतात. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील अधिकार्यांनी संयुक्तपणे व अतिशय सुनियोजित कारवाई करण्याची गरज या भागातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. या नदीपात्रातील सातत्याच्या वाळू उपशामुळे हजारो जलचर नष्ट झाले आहेत.