निरोगी समाज निर्माण करण्यासाठी स्वच्छता मोहीम महत्त्वाची

0

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण विकास योजनेत लोकसहभाग महत्त्वाचा

नवी मुंबई । शासन ग्रामविकासासाठी अनेक योजना राबवित आहे. या योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग हा महत्त्वाचा असतो आणि त्यातूनच आदर्श ग्रामपंचायती तयार होतात. असे प्रतिपादन कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी केले. मंगळवारी कोकण विभागातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्त यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे विवेक भिमनवार, उपायुक्त गणेश चौधरी, यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी उपस्थित होते.

धाटाव ग्रामपंचायतीला मिळालेला प्रथम पुरस्कार सर्वांच्या प्रयत्नामुळे
रोहा तालुक्यात धाटाव ग्रामपंचायतीला मिळालेला प्रथम पुरस्कार सर्वांच्या प्रयत्नामुळे मिळाला आहे. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी समुह विकासासाठी पुढे यावे असे तटकरे म्हणाल्या. या ग्रामपंचायतीस विभाग स्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रथम क्रमाकांचा १० लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला. तर ग्रामपंचायत आंदुर्ले जि.सिंधुदूर्ग व ग्रामपंचायत भोगवे जि.सिंधुदूर्ग यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचा ८ लाख व ६ लाखाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

यांनाही मिळाले पुरस्कार
स्व.आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार (कुटूंब कल्याण) विभागस्तरावरील विशेष पुरस्कार रु.३० हजार ग्रामपंचायत पास्थळ ता.जि.पालघर यांना प्राप्त झाला आहे. स्व.वसंतराव नाईक पुरस्कार (पाणी व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन) विभागस्तरावरील विशेष पुरस्कार रु.३० हजार ग्रामपंचायत देवघर ता.खेड जि.रत्नागिरी प्राप्त झाला आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (सामाजिक एकता) विभागस्तरावरील विशेष पुरस्कार रु.३० हजार ग्रामपंचायत म्हाळुंगे ता.भिवंडी जि.ठाणे यांना प्राप्त झाला आहे.