धुळे । शेतकर्यांना पिककर्जाचा पतपुरवठा सुरळीत व वेळेवर व्हावा यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याबरोबरच, शेतकरी खाजगी सावकाराकडे वळणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी तसेच खरीप हंगामासाठी शेतकर्यांना दर्जेदार खते व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्याच्या सुचना पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शनिवार, 7 रोजी खरीप पूर्व हंगाम आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, सामेती प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, उपविभागीय कृषी अधिकारी पी.एम. सोनवणे, विनय बोरसे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आधार लिकींगचे आवाहन
पुढे बोलतांना पालकमंत्री भुसे यांनी, हवामान खात्याने यावर्षी पावसाळा समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करावे अशा सुचनाही केल्या. शेतकर्यांना देण्यात येणारे अर्थ सहाय्य हे थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्यामुळे सर्व शेतकर्यांनी बँक खात्याशी आधार लिकींग करून घेण्याचे आवाहनही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी केले.
पाणी उपसा करणार्यांवर कारवाई करा
यावेळी आमदार कुणाल पाटील म्हणाले की, शेती व्यवसाय करतांना होणार्या अपघातांमुळे बर्याच शेतकर्यांचा मृत्यू ओढवतो तर काहींना अपगंत्व येते, यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शासनामार्फत राबविण्यात येते या योजनेची मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करून जनजागृती करावी, तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत, उपलब्ध जलसाठ्यांमधून अनधिकृतपणे मोटारी लावून पाणी उपसा करणार्यांवर कारवाई करावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन
प्रास्ताविकात बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, जिल्ह्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू असून पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातील कृषी नियोजनाच्या दृष्टीने खरीप हंगामास अनन्य साधारण महत्व आहे. गेली काही वर्षे शेतकरी बांधवांना अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खरीप हंगाम-2018 चे सूक्ष्म नियोजन महत्वाचे असल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामाची योग्य दिशा व नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.