नवी मुंबई । सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्रातील माथाडी व सुरक्षारक्षक संघटनानी लाक्षणिक संप पुकारला आहे. परिणामी राज्यभरातील कृषिउत्पन्न बाजार पेठ बंद आहेत. छत्तीस माथाडी मंडळांचे विलिनीकरण करून एकच माथाडी मंडळ गठीत करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्त करणे, शासनाच्या उद्योग उर्जा आणि कामगार विभागाने ठरवलेले धोरण आणि किरकोळ व्यापार धोरण संबंधीचा निर्णय हे दोन्ही, माथाडी कायदा आणि माथाडी कामगार चळवळ मोडीत काढणारे आहेत. त्यामुळे ते तात्काळ रद्द करावेत ही आंदोलक कामगारांची मागणी आहे. राज्यभरतील जवळपास साडेचार लाख कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाचे हे दोन्ही निर्णय माथाडी कायदा आणि माथाडी कामगार चळवळ दोन्ही मोडीत काढणारे आहेत, त्यामुळे त्याला तीव्र विरोध करण्यासाठी आणि शासनाचा हा निर्णय रद्द करावा यासाठी आज काम बंद आंदोलन केल आहे. माथाडी कामगार व सुरक्षारक्षकांचा सर्वच सघटनानी सहभाग घेतल्याने बाजारपेठांसह खासगी व्यापारावर आजचा आंदोलनाची झळ बसली आहे. यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात कामगार मंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माथाडी आंदोलकानी दिला आहे.
मंत्रालयात होणार्या बैठकीत प्रतिनिधीत्व करण्यासाठी माथाडी आणि सुरक्षा कामगार बचाव समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी बाबा आढाव यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रमुख सदस्य म्हणून आमदार नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, पोपटराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता
माथाडी कामगारांच्या लाक्षणिक संपामुळे वाशीतील फळे व भाजीपाला मार्केटवर परिणाम झाला आहे. आज केवळ 12 गाड्यांची आवक झाली आहे तर जावक शून्य झाल्याची नोंद आहे. परिणामी मुंबईत भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील माथाडी व सुरक्षारक्षकांचा 36 संघटनानी आज लाक्षणिक संप पुकारल्याने मुंबईतील भाजीपाला पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. एरवी बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणून फळे व भाजीपाला मार्केट वगळले जाते. मात्र आज शभर टक्के कामगारांनी सहभाग नोंदविला आहे. दररोज साधारण साडेपाचशे गाड्यांची आवक वाशीतील मुंबई कृषिउत्पन्न बाजार पेठेतील भाजीपाला मार्केटमध्ये होते. तेवढीच जावक मुंबईत होते. मात्र मंगळवारी फक्त 12 गाड्यांची आवक झाली आहे तर जावक शून्य आहे. मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश येथे, गुजरात ,कर्नाटक या परराज्यातील गाड्यांची आजची आवक आहे . बंदमुळे भाज्यांचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. तसाच शासनाचा देखील एका दिवसाचा लाखोंचा महसूल बुडाला आहे.