हाँगकाँग । भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. वी. सिंधूला प्रतिष्ठेच्या हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धेतील निर्णायक लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अव्वल मानांकित असलेल्या ताई जु यिंगने पुन्हा एकदा सिंधूला मात देत हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धा जिंकली. यिंगने गतवर्षीही सिंधूला हरवून ही स्पर्धा जिंकली होती. चायनिज तैपईच्या यिंगने उत्कंठापूर्ण लढतीत सिंधूला 21-18, 21-18 असे हरवले आहे.
अंतिम लढतीत सिंधूने यिंगला चांगली टक्कर दिली. पहिल्या गेममध्ये सिंधूने 18-18 अशी बरोबरीही साधली होती. पण यिंगने तीन गुण मिळवत पहिला गेम जिंकला. दुसर्या गेममध्ये दोन्ही खेळाडुंनी कडवी लढत दिली. सुरुवातीला 3-1 अशी आघाडी घेणार्या यिंगला सिंधूनने सलग तिन गुण मिळवत 4-4 असे बरोबरीत आणले. आपला खेळ उंचावत सिंधूने यिंगवर 10-8 अशी आघाडी मिळवली. पण तिसर्यांदा हाँगकाँग सुपर सीरिज स्पर्धा जिंकण्याच्या इर्षेने कोर्टवर उतरलेल्या यिंगने सिंधूची ही आघाडी फार काळ टिकू दिली नाही. तिने 11-11 अशी बरोबरी साधत आपल्या खेळाचा वेग वाढवला.