मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाना साधला होता. दरवर्षी रावण उभा राहतो मात्र भाजपाला राम मंदिर उभारता आले नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होत . या टीकेला नारायण राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करत आहेत आधी त्यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधून दाखवावं. तसंच निवडणुका जवळ आल्या असल्यानेच शिवसेनेला राम मंदिराची आठवण आल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी येत्या २५ नोव्हेंबरपासून अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली. राम मंदिर बांधणार की नाही हे आधी भाजपाने सांगावे आणि त्यांना शक्य नसेल तर ते आम्ही बांधू असेही त्यांनी म्हटले होते. यावरही नारायण राणेंनी टीका केली आहे. शिवसेनेला मुंबईतल्या समस्या सोडवता आल्या नाहीत. शिवसेनेचे मंत्री केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना इतके दिवस राम मंदिराचा प्रश्न का उपस्थित केला नाही असाही सवाल नारायण राणेंनी विचारला आहे. तसंच एवढाच स्वाभिमान होता तर राजीनामा देऊन शिवसेनेचे मंत्री बाहेर का पडले नाहीत? असेही राणेंनी विचारले आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेलं भाषण म्हणजे किर्तनकार आले आणि किर्तन करून गेले या ढंगाचं होतं असं म्हणत या भाषणाचीही नारायण राणेंनी खिल्ली उडवली आहे.