केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाकित
पिंपरी-चिंचवड : आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये भाजपला फटका बसू शकतो. तर, उत्तर पूर्वच्या तिन्ही राज्यात भाजपची सत्ता येईल. दलित मते भाजपकडे वळली आहेत. 2019 च्या निवडणुकीला माझा पक्ष आणि मी भाजप सोबत आहोत, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच शिवसेनेला सोबत ठेवणे आवश्यक आहे. सेनेचा एकदा मंत्री करावा आणि उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करावी. 2019 ला राज्यात 2 जागांवर निवडणूक लढणार असून विधानसभेला एक जिल्ह्यात 1 ते 2 जागा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. किमान 40 जागा लढविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राणे माझ्या पक्षात यायला हवे होते!
पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचेवतीने गुरुवारी पिंपरीत सामाजिक सलोखा परिषदेचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी, आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला विभागाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते. आठवले पुढे म्हणाले, भीमाकोरेगाव मध्ये आता शांतता आहे. दलित आणि मराठ्यांमध्ये एकता हवी आहे. दोन्ही समाजांची एकत्र येण्याची भूमिका आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार मुलाखतीत आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावे असे म्हणाले होते. परंतु, दलितांना जातीच्याच आधारावर आरक्षण द्यावे जोपर्यंत जाती जात नाहीत तोपर्यंत आरक्षण जाणार नाही. महाराष्ट्रात 2014 ला काँग्रेसला घालवण्याची प्रबळ इच्छा होती. 2019 ला काँग्रेसला न येऊ देण्याची प्रबळ इच्छा आहे. आगामी निवडणुकीत भाजपला थोडा राजस्थानसारख्या काही राज्यात फटका बसू शकतो असे सांगत आठवले म्हणाले, शिवसेनेला चांगली खाती मिळाली नाहीत म्हणून त्यांची नाराजी असू शकते. शिवसेनेला एखादे कॅबिनेट पद मिळावे. यासाठी मी प्रयत्नशील आहे. नारायण राणे माझ्या पक्षात आले तर चांगली गोष्ट झाली असती. त्यांना मीच सल्ला दिला की काँग्रेसमधून माझ्याकडे या किंवा भाजपकडे जा, पण त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला.
दलित-मराठा एकत्र नांदण्याची गरज
वढुबुद्रुकच्या प्रकरणानंतर मी गावाला भेट दिली आहे. सर्व मिटल्याचे मला समजले. मराठा समाजाने सहकार्य केले. त्याबद्दल मराठा समाजाचे आभार. ज्याच्या विरोधात पुरावे सापडतील त्याला तात्काळ पकडावे, अशी आमची मागणी असणार आहे. तसेच कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, असे आठवले म्हणाले. स्थानिक पुढारी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना मान देत नाहीत. आम्ही कुणीतरी मान द्यावा म्हणून लढत नाही. वेळ आल्यानंतर यांनाही मान मिळेल. समाजामध्ये दलित आणि मराठा एकत्रित पणे नांदण्यासाठी ही सामाजिक सलोखा परिषद घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.