तीन अपत्ये प्रकरणी दाखल होती हरकत ; समर्थकांनी केला जल्लोष
धुळे- महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार शितल मोहन नवले यांना तीन अपत्ये असल्याने ते ही निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याची हरकत काल घेण्यात आली होती. या हरकतीवर रात्र उशिरापर्यंत सुनावणी होऊनही निर्णय झाला नव्हता. शुक्रवारी सकाळी हरकतीवर निर्णय घेण्यात आला. निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ यांनी हरकत फेटाळली. निर्णय जाहीर होताच शितल नवले यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. धुळे महापालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून मनपाच्या प्रभाग 17 बद्दल दररोज काही न काही वृत्त व चर्चा समोर येत होते. त्यामुळे नागरिकांचे लक्ष या प्रभागाकडे लागून होते. या प्रभागातून भावी महापौर असलेल्या दिग्गजांची उमेदवारी दाखल झाल्याने हा प्रभाग अधिकच चर्चेत आला होता. प्रभाग 17 ड मधून शितल नवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शितल नवले यांच्याविरुध्द तब्बल सात हरकती दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये त्यांना तिसरे अपत्य असल्याने शितल नवले यांना निवडणूक लढविण्यास मनाई करावी. हा प्रमुख मुद्दा होता. विशेष म्हणजे शितले नवले यांचे काका तुळशीराम नवले यांच्यासह जयराम पाटील, प्रशांत नवले. संजय नवले, आदींनी हरकत घेतली होती. यावेळी रावण नवले यांच्यावतीने अॅड. कुंदन पवार यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी शितल नवले यांच्या मयत मुलाचा मृत्यू दाखलाच सादर केला. तर शितल नवले यांच्यावतीने अॅड. अलोक वर्मा, अॅड. समिर पंडीत यांनी युक्तिवाद केला. सुनावणी नंतर निकाल राखीव ठेवण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी निकाल दिला. त्यात तीन अपत्ये असल्याची हरकत फेटाळण्यात आली. निकाल ऐकताच शितल नवले यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.