नवी दिल्ली – देशात एकीकडे सुरु असलेल्या कोरोनाच्या कहर सुरु असताना दुसरीकडे सर्रास पणे प्रचार सुरु ठेवणाऱ्या निवडणूक आयोगाला उशिरा का होईना पण शहाणपण सुचला आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही ५ राज्यांच्या निवडनुकीमध्ये सुरु असलेल्या प्रचारसभा आणि गर्दी यामुळे नाराजी जाहीर होत होती. त्यातच मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार आहात अशा शब्दांत फटकारलं आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी रॅलींवर बंदी आणली आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने मतमोजणीच्या दिवशी करोनाच्या नियमांचं पालन कशा पद्धतीने केलं जाईल यासंबंधी ब्ल्यू प्रिंट सादर करण्यास निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली होती.