प्रांतांचा ईशारा ; बीएलओंना धमकावल्यास ‘फौजदारी’ दाखल होणार
भुसावळ- बीएलओ यांनी मतदारांमध्ये मतदान दुरुस्ती संदर्भात प्रचार-प्रसार तसेच दिलेल्या वेळेत काम पूर्ण करावे, मतदारांच्या घरापर्यंत जावून नावांबाबत खात्री करावी, कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास बीएलओ (मतदान केंद्र अधिकारी) यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिला. बीएलओ यांना न सोडणार्या मुख्याध्यापकांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
उत्कृष्ट बीएलओंचा सन्मान
प्रांताधिकारी चिंचकर यांनी तालुक्यातील बीएलओंची बैठक घेतली. प्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते. प्रसंगी उत्कृष्ट काम करणार्या बीएलओंचा प्रांतांनी सन्मान केला. प्रांताधिकारी चिंचकर म्हणाले की, बीएलओ यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास खपवून घेतला जाणार नाही तर काही बीएलओंना प्रसंगी नोटीसाही देण्यात आल्या. निवडणूक कामासाठी न सोडणार्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचाही इशारा त्यांनी देत तसे पत्र शिक्षणाधिकारी यांना देण्याचे आदेश त्यांनी दिले. निवडणुकीचे काम करताना काही लोक बीएलओ यांना धमकावतात, अशा तक्रारी कानावर आल्या असून त्यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला. मतदार याद्यांमधील नावांची दुरूस्ती करणे, मतदार यादीत नाव आहे मात्र फोटो नाही म्हणून कलर फोटो घेणे आदी विषयांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.