बँक अधिकार्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचे आदेश
जळगाव – आगामी लोकसभेच्या निवडणूकीत निवडणूक लढविणा-या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. तथापि निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेला छेद देण्यासाठी उमेदवारांकडून विविध क्लुप्त्या वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल बँका, सहकारी बँका तसेच पतसंस्थांनी निवडणूक काळात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशनाप्रमाणेच आर्थिक व्यवहार होतील. यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.
निवडणूक काळात बँकांनी घ्यावयाची काळजी या विषयावर बँकांच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्र.सी.पंडीत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, लीड बँकेचे अधिकारी, भारतीय रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, राष्टीयकृत बँकांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, निवडणूकी दरम्यान उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैश्यांव्यतिरिक्त वस्तु स्वरूपात अनेक प्रलोभने दाखवितात. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांने उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुक लढविणा-या उमेदवाराला निवडणूकीसाठी 70 लाख रूपयांची खर्च मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेपेक्षा अधिक खर्च होणार नाही यावर लक्ष ठेवावे. बँकांनी उमेदवारांची खाती प्राध्यान्यक्रमाने उघडून घेवून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 10 लाखापेक्षा जास्त रकमेच्या भरणा किंवा पैशे काढलेल्या व्यवहाराची माहिती महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांच्या पत्यावर नोंदवावी. बँकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करतांना सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी उपस्थितांना दिल्यात.