जळगाव । मेहरूण तलाव परिसरातील लेक रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील बी-2 प्लॅट मधील सेवा निवृत्त शिक्षीका दिल्लीला नोकरीस असलेल्या मुलाकडे गेल्या असतांना त्यांच्याकडे घरफोडी झाल्याची घटना रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाज्याचे लॉक तोडून घरातील अडीच लाखाची रोकड तसेच 77 ग्रँम सोन्यांचे दागिन्यांवर डल्ला मारीत 4 लाख 30 हजार रुपायांचा मद्देमाल चोरून नेला. दरम्यान, अपार्टमेंन्टमधील सोळापैकी केवळ नऊ फ्लॅट रिक्त असुन गेली दोन महिने कुणाला चोरी झाल्याचा थांगपत्ता लागला नाही. आज रविवारी दुपारी घरमालक मधुबाला जोशी घरी परतल्यावर त्यांना मुख्यदाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे आढळून आले.
लेक रेसीडेन्सीत किमान पन्नास लाखांचा एक फ्लॅट आहे, सोळा फ्लॅटची सोसायटीही कार्यरत आहे. सोसायटीने चोरट्यांना व आगंतुक येणार्यांना सीसीटीव्ही असल्याचे भासवण्यासाठी लेक रेसीडेन्सीच्या दर्शनी भागावर आणि आत शिरतांना, सावधान आपण सिसीटीव्ही कॅमेराच्या निरीक्षणात असल्याचा फलक लावलेला आहे. मात्र सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाही. गेल्या एक महिन्यापुर्वीच वावडदा येथील राजेंद्र बाबुलाल गोपाळ हे कुटूंबासह वॉचमन म्हणुन रहायला आले असून पुर्ण रहिवाश्यांची साधी ओळखही त्यांना नाही.
जळगाव-शिरसोली रोडवर मेहरुणतलाव काठावर लेक रेसिडेन्सी अपार्टमेट आहे. या अपार्टमेंट मध्ये सोळा फ्लॅट आहे. त्यात मधुबाला बाळकृष्ण जोशी (वय-65) या दुसर्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा राहुल दिल्ली येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. मुलगी पुण्याला आहे, त्यातच मधुबाला या सिधी कॉलनीतील संत हरदासराम सिंधी हायस्कुल मधुन सेवानिवृत्त झाल्यापासुन एकट्याच राहत होत्या, 5 मे रोजी त्या दिल्ली येथे मुलाकडे गेल्या होत्या, दोन महिने मुलाकडे राहुन त्या आज दुपारी तीन वाजता घरी परतल्या घरी आल्यावर त्यांना फ्लॅटचे मुख्यदाराचे कुलूप तोडलेले आढळून आले. मुख्य दारावर आणखी एक जाळीचे दार असून त्याचे लॉक खराब असल्याने ते तसेच अडकवलेले होते. दाराचे कुलूप तोडून दार उघडेच असल्याने त्यांनी आत शिरल्यावर पाहिले असता दोन्ही बेडरुम मध्ये साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. तत्काळ त्यांनी शेजारीच राहणारे डॉ. धनजय बेंद्र यांना कळविल्यानंतर डॉ. बेंद्र यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना संपर्क साधत घरफोडी झाल्याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक निरीक्षक सुनील कुराडे, उपनिरीक्षक रोहन खंडागळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच ठसे तज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन गांगुर्डे, पोहेकॉ. राजेंद्र महाजन यांनी पाचारण करुन घेत घटनास्थळावरुन माहिती घेतली.
असा झाला मुद्देमाल चोरी
फ्लॅटमालक गावाला गेले असल्याने आत शिरलेल्या चोरट्यांनी अगदी निवांतपणे चोरी केली असून मधुबाला जोशी यांच्या फ्लॅट मधील स्वयंपाक घरात फ्रिजसह, देवघर, बाथरुम मध्ये सुद्धा चोरटयांनी शोध कार्य राबवले, दोन्ही बेडरुम मधील गोदरेज कपाट, व इतर कपाटे उघडून साहित्य अस्ताव्यस्त करीत ऐवज चोरुन नेला. यात चोरट्यांनी 2 लाख 50 हजार रोख तसेच 50ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या,10 ग्रॅमच्या गळ्यातील कंठी हार,12 ग्रॅमच्या तीन अंगठ्या व 05 ग्रॅमचे कानातले तसेच चांदीचे भांडे असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.