निव्वळ प्रसिद्धीसाठीच #Me Too ही चळवळ सूरू : डॉ. संजय उपाध्ये

0

गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक प्रवचनाचे आयोजन

‘मिठू मिठू-मी टू’ या विषयावरील चाळिसावे पुष्प पडले पार

चिंचवड : काम आणि शृंगार यातील फरक जेव्हा लक्षात येत नाही, तेव्हा ‘मी टू’सारख्या चळवळी उदयास येतात. सवंग प्रसिद्धीसाठी केलेल्या अशा चळवळींना दुर्लक्षित करणे, हाच त्यावरचा उपाय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार डॉ.संजय उपाध्ये यांनी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिक प्रवचन मालिकेंतर्गत ‘मिठू मिठू – मी टू’ या विषयावरील चाळिसावे प्रवचनपुष्प गुंफताना डॉ.उपाध्ये बोलत होते. हे प्रवचन पवनानगरमधील काशीधाम कार्यालय येथे पार पडले. अरुणा मराठे, डॉ. प्रताप कोठारी, अशोक साठे, विजय भिसे, प्रदीप गांधलीकर आणि मुख्य संयोजक राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रवचनापूर्वी डॉ.चारुदत्त देशपांडे यांचे गायन आणि सतारवादन झाले. याप्रसंगी अध्यात्माचा सखोल अभ्यास करून वयाच्या अठ्ठयाऐंशीव्या वर्षी दोन विस्तृत खंडांचे ग्रंथलेखन करणारे विनायक पुरुषोत्तम फडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

म्हणून या चळवळी फोफावतात

डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, पाच हजार वर्षांची प्राचीन परंपरा लाभलेल्या भारतीय संस्कृतीने आहार, निद्रा, भय आणि मैथुन या प्रेरणा सर्व प्राण्यांमध्ये असतात असे म्हटले आहे. यापैकी आहार, निद्रा, भय या मूलभूत प्रेरणा जन्मापासून मनुष्य शरीरात असतात. परंतु मैथुनाची प्रेरणा ही वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते साठाव्या वर्षापर्यंत अस्तित्वात असते. म्हणजेच मैथुन ही गौण, नगण्य प्रेरणा असूनही पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे समाजात तिला अनावश्यक महत्त्व प्राप्त झाले आहे. माणसात आणि इतर प्राण्यांमध्ये असलेल्या मैथुनाच्या प्रेरणेला बुद्धी प्रामाण्यवादाने नियंत्रित केले तरच माणूस हा जनावरांपेक्षा वेगळा ठरतो. वास्तविक स्त्री-पुरुष यांचे साहचर्य नैसर्गिक आहे. स्त्री-पुरुष हा भेद कायमस्वरूपी आहे तसेच स्त्री-पुरुष आकर्षण कायमस्वरूपी राहणार आहे. पाश्‍चात्त्यांच्या प्रभावाने स्त्रीमुक्तीच्या खुळ्या कल्पनांचा पुरस्कार करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ‘मी टू’सारख्या चळवळी फोफावतात.

सामाजिक अधोगतीचे लक्षण

निसर्ग नियमातून मुक्ती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे. नारायण मूर्ती-सुधा मूर्ती यांचा आदर्श घेण्यापेक्षा नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्याविषयी चर्चा घडू लागतात, हे सामाजिक अधोगतीचे लक्षण आहे. संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम महाराज किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खर्‍या अर्थाने बुद्धिवंत होते. परंतु आजकाल निरर्थक वाद घालणार्‍यांना बुद्धीवादी म्हटले जाते, हे दुर्दैवी आहे. स्त्री आणि पुरुष यांनी समान बौद्धिक पातळीवर येऊन उत्स्फूर्तपणे दिलेले आलिंगन आणि काम भावनेने प्रेरित होऊन मारलेली मिठी यातील फरक जेव्हा कळायला लागेल, तेव्हा ’मी टू’सारख्या घटना उद्भवणार नाहीत. पुरुषाच्या नजरेतील भाव ओळखून त्याला खंबीरपणे रोखण्याचे संस्कार आपल्या मुलींवर घडवणे ही आईवडिलांची, विचारवंतांची, समाजधुरिणांची आणि माध्यमांची जबाबदारी आहे, असेही डॉ. उपाध्ये यांनी सांगितले. गोपी बाफना, राहुल वाघोले, शेखर स्वामी, प्रवीण भोकरे, नवनाथ सरडे, महेश गावडे, ज्ञानोबा जाधव, धीरज गुप्ते, युवराज गायधनी यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास पोफळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.