शिंदखेडा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहताहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला अध्यक्षांनी रामराम ठोकल्याने खेडोपाडी गावागावात कोरोनाचा फैलाव होत आहे. आपत्ती व्यवस्थापन समित्या केवळ कागदावरच न राहता कोरोना रोखण्यासाठी पुन्हा ग्रामआपत्ती समित्यांना गती देण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणासाठी जनजागृती करणे, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळणे अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी सर्वच नागरिकांनी काळजी घेऊन पुढाकार घेऊन पुन्हा ग्राम आपत्ती समित्या सक्रीय कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गतवर्षी ग्राम आपत्ती कमिटी स्थापन झाली. त्या काळामध्ये डिझेल, पेट्रोल बंद केले होते. आपत्ती समितीतील सदस्यांनी डिझेल, पेट्रोल मिळण्यासाठी ओळखपत्राचा भरपूर प्रमाणात उपयोग केला होता. अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कमिटीने उत्कृष्टरित्या काम केले. कोरोनाचे संकट कमी झाले. परंतु पुन्हा कोरोनाने तोंडवर काढले आहे. त्यामुळे ग्राम आपत्ती समित्या कार्यान्वित करण्याची गरज आहे.
अनेक गावातून ग्राम आपत्ती समितीने चांगल्या प्रतीचे काम केले होते. त्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतु ज्या गावांमध्ये ग्राम आपत्ती समिती कागदावरच राहिली अशा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कारण बाहेरून येणारे नागरिक, बाहेर जाणारे नागरिक व गावातील व्यवस्था यांच्यावरती कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला होता. या ग्राम आपत्ती समितीमध्ये अध्यक्ष सरपंच, सचिव तलाठी होते. कृषी सहाय्यक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश ग्राम आपत्ती समितीमध्ये आहे.
समित्यांमध्ये तरुणांचा समावेश करण्याची गरज
सध्या कोरोना ग्राम आपत्ती समिती व्यवस्थापन समित्या कागदावरच राहिल्या आहेत. प्रत्यक्षात समितीचे कामकाज शून्य आहे. तरी लोकप्रतिनिधींनी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पुढाकार घेऊन गावोगावच्या ग्राम आपत्ती समित्या पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. यामध्ये सामाजिक तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करण्याची आवश्यकता आहे.