निगडीत पार पडली बैठक; भाजपमधील अंतर्गत संघर्ष चिघळणार
पिंपरी-चिंचवड : 425 कोटींच्या रस्ते विकासकामात 90 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्राची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यावरुन पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. एकमेकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, निष्ठावानविरुद्ध पक्षातील नवीन असा वाद पुन्हा उफळला आहे. खासदारांच्या राजीनाम्यामुळे निष्ठावन गट अधिक आक्रमक झाला असून, आगामी काळात निष्ठावान पदाधिकारी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.
खासदारसमर्थकांची निगडीत बैठक?
भ्रष्टाचार प्रकरणाची शहानिशा करुन वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वर्षा बंगल्यावर बैठक बोलविली होती. परंतु, ही बैठक रद्द झाली. त्यानंतर भाजपच्या निष्ठावान पदाधिकार्यांची, खासदार समर्थकांची शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास निगडीत एक गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत निष्ठावान कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन पालिकेत गैरव्यवहार होत असल्याचे आरोप पक्षावर होत आहेत. तसेच पालिकेतील काही अधिकारी गैरव्यहाराला हातभार लावत असून या सर्वांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे, सूत्रांनी सांगितले. पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीने एकाचवेळी 425 कोटींच्या रस्ते विकासकामाला मंजुरी दिली. या कामांमध्ये रिंग झाली असून, 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या खासदारांनी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी केला. यावरुन दररोज भाजपवर आरोप होऊ लागले. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याची चौकशी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले. यावरुन भाजपमध्ये कलह निर्माण झाला आहे.
फेरबदलामुळेही निष्ठावान गट आक्रमक!
दरम्यानच्या काळात, भाजपच्या पक्ष संघटनेत फेरबदल करण्यात आले. खासदाराच्या समर्थकाला संघटन सरचिटणीस या महत्वाच्या पदावरुन जबाबदारी मुक्त करण्यात आले. तसेच आणखी एका स्वीकृत नगरसेवकालादेखील सरचिटणीसपदावरुन मुक्त करण्यात आले. हेदेखील भाजपचा निष्ठावान गट आक्रमक होण्याचे कारण असल्याचे, बोलले जात आहे. तसेच त्याला पिंपरी विधानसभेची देखील किनार असल्याची, चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.