ठाणे । नेरुळ जिमखाना येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश असोसिएशनच्या जलतरणपटूंनी विशेष कामगिरी करीत पारितोषिकांची लयलूट केली. विविध प्रकारात पार पडलेल्या या स्पर्धेत 6 वर्षाखालील गटात स्टारफिश असोसिएशन क्लबच्या निष्ठा गिरिष शेट्टी हिने वैयक्तिक विजेतेपदासह तीन सुवर्ण व एक कांस्यपदक जिंकले. 8 वर्षांखालील गटात आदित्य घाग याने वैयक्तिक विजेतेपद पटकावित तीन रौप्य व एक सुवर्णपदक पटकावले.
6 वर्षाखालील गटात आयुषी कैलास आखाडे हिने एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्यपदक, तर रियान नरोटे याने एक रौप्य व दोन कांस्यपदके पटकावली. 10 वर्षांखालील गटात नील वैद्य याने एक रौप्य व एक कांस्यपदक पटकाविले. तर गार्गी शिटकर हिने एक रौप्य व दोन कांस्यपदके पटकावली. या स्पर्धकांना कैलास आखाडे, नरेंद्र पवार, मनोज कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.