रावेर : तालुक्यात निसर्ग पुन्हा कोपल्याने अहिरवाडी पट्टयातील अनेक हेक्टरवरील केळी बागा भुईसपाट झाल्या आहेत तर विजेचे खांब, विजेची डीपी वादळामुळे वाकली असून अनेक घरांची पडझडदेखील झाली आहेत. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांकडून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने अहिवाडी, मोरगाव, रावेर पट्टयाला झोडपुन काढले आहे. अहिरवाडी येथे बाळू महाजन, शिवम चौधरी, कडू चौधरी, सदाशीव सावळे, शिवलाल महाजन यांचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून विजेचे खांब वाकले आहेत. विद्युत डीपीदेखील वाकली आहे. अनेक घरांची पडझड झाली तर अनेक नदी-नाल्यांनादेखील पूर आला आहे. पंचायत समिती सदस्या धनश्री संदीप सावळे या भागाची पाहणी करीत आहेत. महसूल प्रशासनाने संबंधीत बाधीत भागांच्या तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.