नीरा नदीतील हजारो मासे मृत

0

सांडपाण्यामुळे पाणी झाले प्रदूषित : नदी स्वच्छ करण्याची मागणी

बारामती : नीरा नदीत गेल्या काही दिवसांपासून कत्तलखान्याचे सांडपाणी, दूध प्रकल्पांचे सांडपाणी, मळी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. परिणामी नदीतील हजारो मासे मृत झाले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नीरा नदी स्वच्छ करण्याचा संकल्प करावा, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

नदीतील पाणी पुढे सोनगावच्या संगमावर पोचते. सध्या नीरेपासून सांगवीपर्यंतच्या भागात नदीत वेगवेगळे सांडपाणी सोडले जात असून, या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. शेतीला पाणी देतानाही तोंडाला रुमाल लावून पाणी द्यावे लागत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. नदीतील हजारो मासे मृत झाल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. हे पाणी पाझरून विहिरींमध्ये पोहचू लागल्याने गंभीर आजारांना निमंत्रण मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याचा रंगदेखील बदलला असल्याने जनावरांनादेखील पाणी पिण्यास दिले जात नाही.

कारवाईचे आदेश

नीरावागज, घाडगेवाडी, खांडज, मेखळी, शिरवली या गावांतील शेतकर्‍यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांना या पाण्याच्या प्रदूषणाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली. त्यावरून देवकाते यांनी नीरा नदीच्या पाण्याची पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधून या पाण्यात बेकायदा सांडपाणी मिसळणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पिकांना धोका

पाणी एवढे खराब आहे, की शेतीला देखील द्यायला नको वाटत आहे. पाण्यात उतरल्यानंतर पायाला जखमा होत आहेत. गव्हाच्या पिकाला पाणी दिल्याने त्याचे कोवळे शेंडेच जळून गेल्याने नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नदीकाठची गव्हाची पिके जळून चालली आहेत. पाणगवताला देखील धोका निर्माण झाला आहे. नीरा नदीचे पाणी कधी कधी दूषित व्हायचे. मात्र आता पाणी एवढे प्रदूषित झाले आहे, की संपूर्ण नदीच काळी झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.