भुसावळ । राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने देशभर झळाळी लाभलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील नीलेश भिल्ल हा त्याच्या लहान भाऊ गणपत भिल्लसह तब्बल तीन महिन्यांपासून घरातून अचानक बेपत्ता झाला होता. पोलिसांनी दोघा भावंडाच्या शोधार्थ जंग-जंग पछाडले होते. अखेर कानपूरातील एका स्वयंसेवी संस्थेने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर गणपत भिल्लचा ठावठिकाणा पोलिसांना गवसला. गणपत यास ताब्यात घेण्यासाठी त्याच्या आईसह मुक्ताईनगर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. नीलेश भिल्लचा मात्र ठावठिकाणा लागला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कोथळी ते कानपूर प्रवास
शाळेत न गेल्याने वडिलांनी रागावल्यानंतर 17 ते 18 मे च्या दरम्यान झोपडीतून नीलेश (12) सह त्याचा भाऊ गणपत (7) पायीच बाहेर पडले होते. सर्वत्र शोध घेऊनही उभयंतांचा तपास लागला नव्हता तर दोघा भावंडाचे कुणीतरी अपहरण केल्याची भीती वर्तवल्याने मुक्ताईनगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सोशल मिडीयासह प्रसिद्धी माध्यमांमधून बालकांबाबत आवाहन केले होते तर या गंभीर प्रकाराची पीएमओ कार्यालयानेदेखील दखल घेत विचारपूस केल्याने पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला होता. तब्बल 91 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रवासात पोलिसांना मंगळवारी कानपूर येथून फोन आल्यानंतर दिलासा मिळाला. बेपत्ता गणपतचा ठाव-ठिकाणा लागल्याने पोलिसांना मोठाच दिलासा मिळाला आहे. गणपतसोबत मात्र त्याचा भाऊ नीलेश नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
प्रयत्न फळाला : 24 जुलै रोजी चिल्डन होममध्ये पोहोचलेल्या गणपत विचारपूस केल्यानंतर केवळ कोथळी गावाचे नावच सांगू शकला. नंतर गुगलवर कोथळीचे नाव शोधल्यानंतर या राज्यातील तीन गावांमध्येही कोथळी असल्याने पालकांचा पत्ता लागला नाही मात्र गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातही कोथळी असल्याचा तपास लागल्यानंतर कमलकार तिवारींनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर माहिती दिली. (उर्वरीत पान 2 वर)
कानपूर रेल्वे स्थानकावर आढळला गणपत
कानपूरातील सेंट्रल लोहमार्ग पोलिसांना गणपत भेदरलेल्या अवस्थेत 24 जुलै रोजी आढळल्यानंतर त्यांनी चाईल्ड लाईन या स्वयंसेवी संस्थेचे निर्देशक कमलकांत तिवारी यांच्याशी संपर्क साधला. तिवारी यांनी या बालकाला किजवई नगरातील सुभाष चिल्ड्रन होममध्ये दाखल केले. गणपत येथपर्यंत कसा पोहोचला वा त्यास कुणी आणले याची माहिती संस्थेच्या पदाधिकार्यांनाही नाही.