मुक्ताईनगर पोलिस पोहोचले गोरखपूरात ; नीलेश म्हणाला आता नाही सोडणार घर…
भुसावळ (गणेश वाघ):- तब्बल नऊ महिन्यांपासून घरातून बेपत्ता झालेला बालशौर्यपुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल गोरखपूरच्या स्नेहालयमध्ये असल्याची वार्ता कळताच नीलेशचे वडील रेवाराम भिल्ल व मुक्ताईनगरचे पोलीस पथक खाजगी वाहनाने गोरखपूरकडे निघाले होते. सोमवारी सकाळी हे पथक तेथे पोहोचले.
पोटाच्या गोळ्याला पाहताच रेवाराम भिल्ल यांनी त्याला मिठी मारताच उपस्थिताना गहिवरून आले. आता पुन्हा घर नाही सोडणार, रागाच्या भरात मी घरातून निघालो होतो, अशी भावना निलेशने वडिलांशी बोलताना व्यक्त केली. पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगरचे एएसआय माणिक निकम व कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे हे गोरखपूर न्यायालयात नीलेशचा ताबा घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यासाठी पोहोचले आहेत. स्नेहालय येथे पोलीस पथक व रेवाराम भिल्ल पोहोचताच त्यांची विचारपूस करण्यात आली शिवाय अत्यंत सन्मानजनक वागणूक आम्हाला दिल्याचे एएसआय निकम म्हणाले. आश्रालयाचे संचालक फादर वर्गीस थॉमस व समन्वयक फादर जोबी तसेच अन्य पदाधिकारी प्रसंगी उपस्थित होते.