जळगाव । तालुक्यातील नाशिराबादसह बेळी, निमगाव, जळगाव खुर्द, कंडारीसह परिसरातील गावातील शेतकरी नील गाय व रानडुक्कर सारख्या वन्यप्राण्याच्या हैदासामुळे गेल्या अनेक वर्षापासून चांगलेच त्रस्त आहेत. वनविभागाकडे वारंवार तक्रार करून देखील अद्या पावतो या प्राण्याच्या बंदोबस्त झाला नाही. या उपद्रवी वन्यप्राण्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा. या प्रमुख मागणीसाठी सोमवार 5 जून रोजी सकाळी 11 वाजता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली त्रस्त शेतकरी बांधवाच्या जिल्हाधिकार्यावर मोर्चा नेवून याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
शासनाने वंन्यजीव संरक्षण कायदा अमलात आणला आहे. या कायदयामुळे जंगलातील प्रत्येक जीवाला संरक्षण देखिल मिळाले आहे. मात्र हा कायदाच शेतकर्याच्या जीवावर उठला आहे. या वन्यप्राण्यामुळे शेतकरी असुरक्षित झाला असून त्यांचे शेत शिवारात जाणे कठिण झाले आहे. पेरणीपासून तर पीक हातात येईपर्यंत शेतकरी प्रचंड खर्चा सोबत मेहनत करतात. मात्र या वन्यप्राण्याच्या उपद्रवाला रोखण्यास शेतकरी राजा असमर्थ ठरत आहे. या बाबत यापूर्वी वनविभागाकडे याप्राण्याच्या बंदोबस्त करण्यासाठी अनेकवेळा शेतकर्यांनी वेळोवेळी निवेदन देवूनही वनविभागाने कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर मोर्चा आकाशवाणी चौकातील मजूर सहकारी फेडरेशन मधील संपर्क कार्यालयापासून निघणार असून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.