बोदवड। तालुक्यातील 10 हजार 668 नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांच्या बँक खात्यात नुकतेच 2 कोटी 4 लाख 68 हजार 206 रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. 2015 मध्ये खरिप हंगामात झालेल्या नुकसानीची दोन वर्षानंतर भरपाई मिळाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात 2015 मध्ये कापूस उत्पादकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. पावसाअभावी तालुक्यातील कापूस उत्पादकांना फटका बसला होता. त्यामुळे नुकसाग्रस्त गावांमधील नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाने केले होते.
भरपाई मिळाल्याने शेतकर्यांमध्ये समाधान
तालुक्यातील 11 हजार 331 हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी 8 हजार 462 हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्राला शासकीय मदत देण्यात आली. त्यासाठी दोन कोटी 4 लाख 68 हजार 206 रुपयांचा निधी संबंधित नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. त्यामुळे दोन वर्षानंतर का होईना शेतकर्यांना भरपाई मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये बोदवडचा समावेश होतो.
कपाशी सोबत इतरही पिकांचे झाले होते नुकसान
तालुक्यातील बहुतांश शेतकरी कोरडवाहू क्षेत्रात कपाशीची लागवड करतात. त्यामुळे बोदवडमध्ये जिनिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आला आहे. मात्र, 2015 मध्ये पावसाअभावी शेतकर्यांना फटका बसला होता. कपाशीसोबत अन्य पिकांचेदेखील हातचे उत्पन्न वाया गेले होते. त्यामुळे प्रशासनाने नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पंचनामे पूर्ण केले होते. तसेच पंचनाम्यांचा अहवालदेखील सादर करण्यात आला होता. तरी गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक मदतीची प्रतिक्षा कायम होती. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक मदत झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
52 गावांचा समावेश
शेतकर्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने उर्वरित शेतकर्यांना लवकरच अनुदानाच्या रकमेचा लाभ मिळणार आहे. नुकसानग्रस्त गावांमध्ये बोदवडसह शेलवड, जामठी, रेवती, येवती, घाणखेड, एणगाव, कोल्हाडी, नाडगाव, शिरसाळा, चिंचखेडसिम, हिंगणे, आमदगाव, राजूर, मुक्तळ, जलचक्र, सुरवाडा, मानमोडी, सोनोटी, जुनोना, कुर्हा हरदो यासह एकूण 52 गावांचा समावेश आहे. या गावांमधील नुकसानग्रस्तांना भरपाईचा लाभ मिळाला आहे. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतरही लाभ मिळत नसल्याने शेतकर्यांना मदतीची प्रतिक्षा लागली होती. मात्र, शेतकर्यांची प्रतिक्षा संपली आहे. 2015 च्या खरीप हंगामातील नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना दोन कोटी 4 लाख 68 हजार 206 रुपयांचे अनुदान बँक खात्याद्वारे जमा करण्यात आले आहे. बँक अधिकार्यांना तत्काळ अनुदान वितरित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बोदवड तालुक्यातील 10 हजार 668 शेतकर्यांना लाभ मिळणार आहे.