धुळे । खरीप हंगाम 2017 मध्ये कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकर्यांना मदतीसाठी राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार धुळे जिल्ह्यास 203 कोटी 10 लाख 42 हजार रुपयांचा निधी तीन हप्त्यात प्राप्त होणार आहे. खरीप 2017 मध्ये कापूस व धान पिकावर किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकर्यांना मदतीसाठी रक्कम वितरीत करण्याबाबत राज्य शासनाने 8 मे रोजी जाहीर केले आहे. या निर्णयात म्हटले आहे, 2017 मधील हंगामामध्ये कापूस व धान पिकांच्या झालेल्या नुकसानीपेाटी विहित केलेल्या दरानुसार बाधित शेतकर्यांना मदत वाटप करण्यासाठी राज्यासाठी एकूण 3484 कोटी 61 लाख 25 हजार एवढी रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
खातेदारांच्या थेट खात्यात रकम होणार जमा
या मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करतांना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. जिल्ह्यांना प्रथम हप्ता वितरीत केल्यानंतर या रकमेचे वाटप झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी. तसे केल्याचे प्रमाणपत्र व निधीचा विनियोग केल्याचे उपयोगिता प्रमाणपत्रासह पुढील हप्त्याची रक्कम वितरीत करण्यात यावी. त्यानंतर संबंधित जिल्ह्यांना पुढील हप्त्याची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.
बँक खात्यात हस्तांतर
बाधित शेतकर्यांना देण्यात येणारी मदतीची रक्कम त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट हस्तांतर पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नसेल, तर अशी व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये म्हणून अन्य पर्यायी व व्यवहार्य ओळखपत्राच्या आधारे जसे आधार नोंदणी पावती, भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र, आयकर विभागाने दिलेले स्थायी लेखा क्रमांक (पॅन), वाहन चालविण्याचा परवाना, पारपत्र, बँकेची पुस्तिका आदींची खातरजमा करुन प्रदान करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.