जळगाव। शहरातील प्रमुख महाविद्यालयापैकी मराठा विद्याप्रसारक मंडळ संचलित नुतन मराठा महाविद्यालय हे एक आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण या महाविद्यालयात दिले जात असल्याने शहरासह जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे. सुविधा पुरविण्याच्या नावाखाली विद्याथ्यार्ंकडून प्रवेश शुल्का सोबत इतर शुल्क आकारले जातात मात्र सुविधा पुरविल्या जात नाही. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यार्थ्यांनी 21 रोजी स्वाक्षरी मोहिम राबवून गुरुवारी 22 रोजी महाविद्यालय परिसरात आंदोलन केले.
या आहेत मागण्या
प्रवेश घेणार्यांची संख्या मोठी असून प्रक्रियापूर्ण करण्यासाठी केवळ दोनच खिडक्या सुरु आहे. संथ गतीने प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वारंवार चकरा मराव्या लागत आहे. खिडक्यांची संख्या वाढवून विद्यार्थ्यांची हेळसाड थांबवावी, प्रवेश शुल्का सोबत सर्व प्रकारशुल्क समाविष्ट असल्याने आकारले जात असतांनाही सायकल, दुचाकी पार्किगसाठी वेगळे शुल्क आकारले जात असल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक लुट होत आहे, ही लुट थांबवावी, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह असावे, शुध्द पाण्याची व्यवस्था असावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली.
पार्किग शुल्क बंद
नुतन मराठा महाविद्यालतील विद्यार्थी किंवा महाविद्यालयात कामानिमित्त येणार्यांकडून वाहन पार्किगसाठी 2 रुपये शुल्क आकारले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कासोबत सर्व शुल्क आकारले गेलेले असतांना देखील वाहन पार्किगसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांनी शुल्क आकारणी बंद करावी अशी मागणी आंदोलनाद्वारे केली. व्यवस्थापन मंडळाने विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर शुल्क आकारणी बंद करण्याचे आश्वासन दिले. 1 जूलै पासून पार्किग शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थी मागणीवर ठाम
विविध मागणीसाठी प्राचार्यांना तीन वेळा निवेदन देण्यात आले मात्र काहीही उपाययोजना करण्यात आले. अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. प्राचार्यांनी आश्वासन दिल्यानंतरही विद्यार्थी मागणीवर ठाम होते. लेखी घेतल्याशिवाय आंदोलन बंद मागे घेण्यात येणार नसल्याची भुमिका विद्यार्थ्यांनी घेतली.