मोशी : येथील किडोज प्लॅनेट या संस्थेच्या शिशुवर्गाच्या बालकलाकारांचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यात या चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर नृत्य करत रसिकांची मने जिंकली. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन लायन्स क्लब व सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख तेजश्री अडिगे, लायन्स क्लब निगडी विभागाचे प्रमुख दिलीप मोहिते, माजी नगरसेविका झामाबाई बारणे, संस्थेच्या अध्यक्षा गौरी सोनकर, संस्थेचे उपाध्यक्ष दीपक पागे, संजय निंबाळकर, जयंत मांडे, रामकृष्ण मंत्री आदी सदस्य उपस्थित होते.
मुलांचे विविध गुणदर्शन!
किडोज प्लॅनेट शाळेच्या विविध शाखांतील शिशुवर्गातील चिमुरड्यांनी आपली कला सादर केली. यामध्ये डान्सग्रुप, पोवाडा, हिंदी व मराठी गाणी आदींवर नृत्य केले. कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक क्षेत्रातील चांगल्या कामासाठी लायन्स क्लब ऑफ पुणेच्या वतीने यंदाचा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार किडोज प्लॅनेटला स्कूलला लायन्स क्लब निगडी विभागाचे प्रमुख दिलीप मोहिते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा गौरी सोनकर व उपाध्यक्ष दीपक पागे यांनी स्वीकारला.
चांगले गुण विकसित करावेत!
त्यावेळी गौरवोद्गार काढताना म्हणाले की, जीवनात प्रकाशमान होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेले चांगले गुण विकसित करण्याचे काम शिक्षक करत असतात. सुसंस्कारीत मुले हीच मनुष्याची खरी संपत्ती आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही शिक्षण संस्था कार्यरत आहे. अधिक प्रगती या संस्थेने करावी.