नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी भविष्यात फायदेशीर

0

पुणे । जगात दोन नॅनोवर्ल्ड आहेत. एक निसर्गनिर्मित आणि दुसरी मानवनिर्मित. नवीन संशोधनाचा आपल्याला उपयोग होतोच, परंतु त्यासोबतच काही प्रमाणात नुकसानालादेखील सामोरे जावे लागते. त्यामुळे संशोधनामध्ये समतोल साधायला हवा. याचा फायदा नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये होईल. नॅनो टेक्नॉलॉजी ही मानवाच्या हितासाठी आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करीत त्याचे तोटे आणि फायदे या दोहोंना सामोरे जायले हवा. नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नोलॉजीचा आरोग्य, शेती, अन्न, उपग्रहातील संशोधन या क्षेत्रात प्रचंड फायदे झालेले भविष्यकाळात दिसतील, असे मत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

पूना गुजराती केळवणी मंडळ संचलित हरीभाई व्ही. देसाई महाविद्यालयामध्ये नॅनोटेक्नोलॉजी फॉर ह्युमन वेल्फेअर या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. ए. एम. देशमुख, डॉ. उल्ड्रीच बर्ग, लुफ्तानेसा बारी, हेमंतभाई मणियार, डॉ. गिरीश पठाडे, डॉ. पानसरे, विनोद दधिया, महेश थारोत, हसमुखभाई पटेल, डॉ. यश मिठारे, डॉ. प्रकाश पंदारे, डॉ. गुलाब गुगळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या परिषदेत भारत व भारताबाहेरून आलेल्या 150 हून अधिक संशोधन पत्रांचे सादरीकरण झाले. इंग्लंड, जर्मनी, दुबई, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन संशोधकांना मिळाले. या परिषदेत 250 हून अधिक विद्यार्थी व संशोधक सहभागी झाले होते.

संशोधन करताना नैतिकता जपावी
कोणतेही संशोधन हे दुधारी शस्त्र असते. त्यामुळे संशोधन करताना आणि संशोधनाचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक व्हायला हवा. आज संशोधन करताना नैतिकता जपावी लागत आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कोणतेही संशोधन करताना मानवाचे हित हाच मुख्य हेतू असला पाहिजे. त्यासोबतच निसर्गाची सुद्धा काळजी घ्यायला हवी, असे डॉ. पंडित विद्यासागर यांनी यावेळी सांगितले. नवीन संशोधनाविषयी मानसिकतेत बदल होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रमात व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे यांनी नॅनोटेक्नॉलॉजीचे महत्त्व यावेळी विषद केले.