नवी दिल्ली । भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आता नवीन चाल खेळली आहे. आता पाकिस्तानने नेपाळमधून नाहीसा झालेला माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल मोहम्मद हबीब झहीर याची भारताकडे चौकशी केली आहे. हबीब 6 एप्रिलपासून नेपाळमधून बेपत्ता झाला असून, जाधव यांना वाचवण्यासाठी भारताने त्याचे अपहरण केले आहे, असे पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले. आपल्या एखाद्या अधिकार्यासंदर्भात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताकडे चौकशीची मागणी केली आहे. कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्शा सुनावण्याच्या काही दिवस आधी हबीब बेपत्ता झाला असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या प्रसिद्धिमाध्यमांनी दिले होते. जाधव आणि हबीब प्रकरणाचा एकमेकांशी संबंध असल्याची शंकाही पाकिस्तानी प्रसिद्धी माध्यमांनी व्यक्त केली होती. दरम्यान, हबीब याच्यासंदर्भात पाकिस्तानने नेपाळकडेही चौकशी केली आहे.
कसलीच माहिती नाही
हबीबबद्दल आमच्याकडे कुठलीच माहिती नसल्याचे भारतीय अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय गुप्तचर संघटना रॉ च्या ताब्यात हबीब असल्याचा अंदाज पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नेपाळमधील भारतीय दूतावसातील अधिकार्यांनी, आम्हीदेखील हबीबची चौकशी करत असल्याचे सांगितले. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यासंदर्भात चौकशी सुुरू असल्याचे सांगितले.
जाधव अपहरणात सहभाग
हबीब बेपत्ता झाल्यावर लष्कराकडून आलेल्या दडपणामुळे कुलभूषण जाधव यांना फाशिची शिक्शा सुनावण्यात आली असल्याची चर्चा पाकिस्तानातील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 2016 मध्ये पाकिस्तानच्या ज्या पथकाने जाधव यांचे अपहरण केले त्यात हबीबचा सहभाग होता असे वृत्त पाकिस्तानातील उक्त या वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे दीर्घकाळ भारतीय गुप्तचर संघटना हबीब यांच्या मागावर होती असेही या वृत्तात म्हटले आहे. हबीब बेपत्ता झाल्यामुळे पाकिस्तान चिडला आहे.
हबीब आयएसआयचा एजंट
सुत्रांच्या माहितीनुसार हबीब याआधी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे काम करायचा. बेपत्ता होण्यापूर्वी हबीब काठमांडूहून लुंबिनीला आला होता. हबीबला संयुक्त राष्ट्र संघाच्या एका विभागाकडून नेपाळमध्ये नोकरीची ऑफर मिळाली होती. त्यासाठी त्याला 8,500 डॉलर्स (अंदाजे 5.50 लाख रुपये) इतके मासिक वेतन मिळणार होते असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, हबीब आयएसआयने सोपवलेल्या एका गुप्त कामगिरीसाठी नेपाळमध्ये आला होता, असा अंदाज वर्तवला जात आहे.