नेरळमधील मच्छी मार्केटचे गाळे बनले दारुड्यांचा अड्डा

0

कर्जत । नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान टॅक्सी स्टँडसमोरील मच्छी मार्केटच्या गाळ्यांची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणच्या माध्यमातून सुमारे 7 लाख रुपये खर्चून करण्यात आली आहे. मात्र, नेरळ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्ष व मंद कारभारामुळे काही गाळ्यांची मुतारी, काही दारुड्यांचा अड्डा तर काही गाळ्यांचा फुकट वापर सुरू झाला आहे. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना रस्त्यावर मच्छी विक्री करावी लागत आहे. पंचायत समितीने मच्छी व्यावसायिकांना या गळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले होते. परंतु, अद्याप हे या व्यावसायिकांना स्थलांतरित करण्यात आले नाही. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील टॅक्सी स्टँड जवळ मच्छी मार्केटसाठी जवाहर रोजगार योजने अंतर्गत 1993 साली दुकानांच्या गाळ्यांची उभारणी करण्यात आली होती.

गाळ्यांचा फुकट वापर सुरू; ग्रामपंचायतीविरोधात तीव्र संताप
या गाळ्यांचा वापर न झाल्याने नादुरुस्त झालेल्या या गाळ्यांची दुरुस्ती जिल्हा परिषदेने सन 2016-2017 या आर्थिक वर्षात सुमारे 7 लक्ष रुपये खर्चून केली. यासाठी नेरळ विकास प्राधिकरणाचा निधी वापरण्यात आला. या गाळ्यांचे 20 डिसेंबर 2016 रोजी गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आजवर नेरळ ग्रामपंचायतीने त्या गाळ्यांचे वाटप न केल्याने त्याठिकाणी सध्या काही गाळ्यांची मुतारी, काही दारुड्यांचा अड्डा तर काही गाळ्यांचा फुकट वापर सुरु झाला आहे. या गाळ्यांसंदर्भात कर्जत पंचायत समितीनेदेखील ग्रामपंचायतीला गाळे वाटप करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजवर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीच्या निद्रिस्त कारभारामुळे मच्छी मटण विक्रेते आपल कासवाच बिर्‍हाड घेऊन रस्त्यावर पोट भरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.