माथेरान । दीड वर्षांपासून बंद असलेली नेरळ -माथेरान मिनीट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी शुक्रवारी रेल्वेच्या काही प्रमुख अधिकार्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी दौरा केला. यावेळी रेल्वेचे दिल्ली बोर्डाचे अधिकारी आर.के.वर्मा, वरिष्ठ अधिकारी संजय शर्मा, अतिरिक्त अभियंता सुबोध नाथ हे उपस्थित होते. नेरळ -माथेरान ही मुख्य ट्रेन सुरू झाल्याशिवाय इथला व्यवसाय आणि पर्यटक वाढणार नाहीत यासाठी इथल्या स्थानिक शिष्टमंडळाने अधिकार्यांना समक्ष भेटून लवकरच नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा सुरू करावी असे निवेदन देवून साकडे घातले होते.
बोग्यांची संख्या वाढवा
30 ऑक्टोबरपासून अमनलॉज-माथेरान अशी शटल सेवा सुरू असल्याने पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. परंतु यामध्ये बोग्यांची संख्या केवळ पाच असून तीन प्रवासी बोग्या तर दोन मालवाहू बोग्या आहेत. यामुळे पर्यटकांना बोग्यांच्या मर्यादेमुळे तिकीटे मिळत नाहीत. त्यांचा भ्रमनिरास होताना दिसत आहे. यासाठी बोग्यांची संख्या वाढवावी असे माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी सांगितले. तर शटलमध्ये दोन ते तीन फेर्या फक्त मालवाहतुकीसाठी केल्यास अनेकांना आपले जीवनावश्यक सामान सहजपणे आणता येईल.
दस्तुरीपासूनच गावात घोड्यावर अथवा हातगाडीमधून सामान आणणे खूपच खर्चिक अन् त्रासदी आहे. असे विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. पर्यटक तसेच स्थानिकांना मुंबई पुण्याकडे जाण्यास शटलच्या वेळेत जाणे शक्य होत नाही यासाठी पहाटेपासून सायंकाळी सात, आठ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहिल्यास रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत देखील वाढणार आहे असे भाजपचे माजी अध्यक्ष अरविंद शेलार यांनी नमूद केले. यावेळी माजी नगरसेवक प्रदीप घावरे, राजेश दळवी, वसंत कदम, विजय चौधरी यांसह अन्य उपस्थित होते.
हेरिटेज गाडीच्या रेल्वे रूळावर असलेल्या काही त्रुटी आम्ही अद्याप जाणून घेत आहे. एकंदरीतच सर्वच मार्ग सुरळीत वाटल्यास नेरळ-माथेरान मिनीट्रेन सुरू करण्याबाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे प्रस्तावित नेरळ -माथेरान मिनीट्रेनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
-आर.के.वर्मा, रेल्वे वरिष्ठ अधिकारी, दिल्ली बोर्ड