नेरीच्या बालकाला साळशिंगीजवळ डंपरने चिरडले

0

संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडल्या : चालकाला अटक

बोदवड : वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव डंपरने चार वर्षीय बालकाला धडक देवून चिरडल्याची हृदयद्रावक घटना बोदवड-भुसावळ रस्त्यावरील साळशिंगी गावाजवळ गुरूवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केल्याने वाहनाच्या काचा फुटल्या तर डंपर चालकास संतप्त जमावाने चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने या परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या अपघातात हर्षल (4, रा.नेरी) या बालकाचा करुण अंत झाला.

अपघातानंतर डंपर चालकास चोपले
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार शांताराम हरी इंधाटे (64, नेरी बुद्रुक, ता.जामनेर) हे आपला नातू हर्षलसह दुचाकी (एम.एच 19 डी.एच 9742) ने नेरीहून साळशिंगी येथे आपल्या मोठ्या सुनबाई सरला प्रमोद इंधाटे यांना घेण्यासाठी येत असताना त्यांचे व्याही बळीराम बाणाईत यांच्या शेताजवळ लघूशंकेसाठी त्यांनी दुचाकी लांबवली असता त्याचवेळी बोदवडकडून भरधाव वेगाने पिवळ्या रंगाच्या डंपरने रस्त्यावर उभ्या असलेल्या हर्षला धडक देत चिरडले व या घटनेत बालकाच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच करुण अंत झाला. अपघातानंतरही डंपर चालकाने वाहन न थांबवता काही अंतरापर्यंत पळ काढल्यानंतर संतप्त जमावाने डंपर चालकास चांगलेच बदडून काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत संतप्त जमावाने डंपरवर दगडफेकदेखील केल्याने वाहनाच्या दर्शनी भागातील काचा फुटल्या. बोदवड पोलिसांनी डंपर चालक प्रकाश भोई (पाडळसे, ता.यावल) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शांताराम इंधाटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.