नगरदेवळा – येथुन जवळच असलेल्या नेरी गावी हातभट्टीची दारू विक्री करतांना तंटामुक्ती समिती च्या सदस्याला अटक करून त्यावर पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात सर्वत्र अवैद्य धंद्यांवर धाडसत्र सुरू असून मोठ्या प्रमाणावर कार्यवाही होत असतांना नेरी परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू विक्री करण्यात येते. या संदर्भात नगरदेवळा पोलिसाना गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आली. पथकाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील नागद येथून सदरची दारू आणली जाते व त्याची नेरी येथे विक्री होते अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे नगरदेवळा पोलीसांनी दिघी फाट्यावर सदर इसमास पकडून ड्रम मध्ये भरलेली हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. सदरचा दारूविक्री करणारा इसम तंटामुक्ती समितीचा सदस्य असून यानेच गावात दारूविक्री बंद करण्याची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. पोलीस हेकॉ. राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर भावराव अहिरे रा. नेरी ता.पाचोरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोउनि नलावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद पाटील, नरेंद्र विसपुते, राजेश पाटील, तुकाराम चौधरी, नरेश शिंदे यांच्या पथकाने केली.