नेहरूंनी श्यामा प्रसाद मुखर्जींच्या मृत्युची चौकशी केली नाही ; जे.पी.नड्डा यांचे घणाघाती आरोप

0

नवी दिल्ली: भाजपकडून देशाचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर सातत्याने आरोप केले जाते. लोकसभा निवडणुकीतही भाजपने नेहरूंवर आरोप केले होते. दरम्यान आता भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंवर आरोप ठेवला आहे. भारतीय जनता पक्षाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इतिहास साक्षी आहे, देशभरातून मागणी होत असतानाही, मुखर्जी यांच्या मृत्युची चौकशी करण्याचे आदेश पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले नाही, असे आरोप नड्डा यांनी केले आहे.

भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भारतीय जनता पार्टीकडून पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. आज पश्चिम बंगाल आणि काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहेत. देश श्यामाप्रसाद मुखर्जींचे बलिदान कधीही विसरणार नाही, असे नड्डा यांनी म्हटले. तसेच, श्यामाप्रसाद यांच्या मृत्युच्या चौकशीची मागणी देशभरातून होत होती. मात्र, पंडित नेहरुंनी या चौकशीचे आदेश दिले नाहीत, इतिहास याचा साक्षीदार असल्याचेही नड्डा यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नड्डांपासून ते वरिष्ठ नेत्यांनीही श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. तसेच, भाजपाकडून आजचा दिवस बलिदान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. देशाची एकता आणि अखंडता यासाठी मुखर्जी यांनी आपले आयुष्य वेचले. शक्तिशाली आणि अखंड भारतासाठी त्यांचे असलेले विचार नेहमीच आम्हाला प्रेरण देत राहतील. महान देशभक्त श्यामाप्रसाद मुखर्जी यांना बलिदान दिनानिमित्त आदरपूर्वक आदरांजली, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.