नैसर्गिक शेती व परसबाग प्रशिक्षण शिबिर

0

कोंढवा । कृषी क्षेत्रात देशाने उल्लेखनीय प्रगती केली असली तरी बळीराजा मात्र अत्यल्प भाव व सततचा वाढीव उत्पादन खर्च याने कोलमडून गेलेला आहे. परिणामी शेतकरी आत्महत्येसारखे चिंतेचे प्रश्‍न निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून आध्यात्मिक आणि नैसर्गिक शेती हा उत्तम पर्याय बळीराजाला अधिक सकस व भरघोस उत्पादन मिळवून देऊ शकतो. नैसर्गिक व आध्यात्मिक शेतीचे प्रशिक्षण शिबिर 25 व 26 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 9 ते रात्री 8 या कालावधीत पुण्यधाम आश्रम येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती झिरो बजेट शेतीचे मधुकर पिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आध्यात्मिक शेतीविषयक नवनिर्मित संकल्पना या शिबिरात शेतकर्‍यांना सांगण्यात येणार आहे. देशी गाईंचे संवर्धन व नैसर्गिक शेतीचा विकास कसा करावा याचे झीरो बजेट नैसर्गिक शेती परिवारातर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशी गाईचे शेण व गोमूत्र यातील उपयुक्त गुणांचा वापर करून बिजामृत व जीवामृत निर्मितीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्याचा वापर परसबागेतील भाजीपाला व्यवस्थापन, तसेच विषमुक्त शेती करण्यासाठी करता येणे शक्य होईल. नैसर्गिक शेतीकडून निसर्गाकडे वळण्याचा प्रयत्न या शिबिरात करण्यात येणार आहे. रासायनिक व सेंद्रिय शेतीतील खर्चापेक्षा कमी खर्चिक व विषमुक्त पिकांचे उत्पादन या पद्धतीने करता येईल. अद्यापपर्यंत 800 शेतकर्‍यांची शिबिरासाठी नोंदणी झालेली आहे. देशी गाईंच्या केवळ 36 प्रजातीच शिल्लक असून गाईंचे संगोपन व विषमुक्त भाजीपाला व पीकांचे उत्पादन या नैसर्गिक-आध्यात्मिक शेतीतून करता येते असे पिसाळ यांनी सांगितले. कमीत कमी पाण्यात व शून्य खर्चात शेती कशी करायची व रोग- कीड नियंत्रणासंबंधी अधिक माहिती प्रशिक्षणात सांगितली जाणार आहे. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातूनही फायदेशीर शेती होऊ शकते, याचे मार्गदर्शन येथे मिळणार आहे.या शिबिरासाठी 500 रुपये शुल्क असून भोजन व निवासाची व प्रशिक्षण साहित्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे.