नोकरांनीच केली साडे बावीस लाखांची लुट

0

मार्केटयार्ड गुलटेकडी परिसरातील घटनाः सोने व हिर्‍यांच्या दागिन्यांची चोरी

पुणे- शहतील चोर्‍यांचे प्रमाण दिवसेंदीवस वाढतच चालले दिसून येत आहे. मार्केटयार्ड परिसरातील गुलटेकडी येथे नोकरांनीच घरात लुट करून साडेबावीस लाखांचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघा नोकरांविरुध्द मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

कपाटातून दागिन्यांची चोरी
फिर्यादी नुसार मनोज पासवान (32), प्रकाश गुजर (20) व एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मनोज व प्रकाश हे फिर्यादींच्या घरीच राहायला असतात. ही घटना 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2018 दरम्यान घडली. फिर्यादी वर्धमानपुरा सोसायटीमध्ये राहातात. त्यांनी नेहमीच्या वापरातील दागिने एका प्लॅस्टिक बॉक्समध्ये घालून तो बॉक्स कपाटात इतर दागिन्यांसोबत ठेवला होता.त्यांनी 1 मार्च रोजी दागिने घालण्यासाठी कपाट उघडले असता, त्यांना सोन्याचा व डायमंडचा नेकलेस (किंमत 22 लाख 60 हजार रुपये) दिसला नाही. त्यांनी घरभर शोध घेतला मात्र, दागिने कोठेही आढळून आले नाहीत.

रूमच्या चाव्या नोकरांकडे
फिर्यादी यांच्या खोलीची चावी वर्षभरापूर्वी चोरीला गेली होती. तसेच, त्यांच्या रुमच्या चाव्या त्यांची घरी काम करणार्‍या तिघाही नोकरांकडे असतात. त्यांना दागिने चोरीची खात्री झाल्यावर त्यांनी रुमचे व कपाटाचे लॉक तपासले असता त्याची कोणत्याही प्रकारची मोडतोड झाली नव्हती.तसेच, त्यांच्या घरी नोकरांव्यतिरीक्त कोणीही व्यक्ती येत नाही. यामुळे नोकरांनीच चावीचा वापर करून दागिने रुमच्या कपाटातून चोरून नेले असल्याची तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गौतम खरात तपास करत आहेत.