जळगाव । सायबर गुन्हात दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. माजी नोकराने मालकाच्या खात्यावर ’सायबर दरोडा’ घातल्याची घटना एरंडोल शहरात घडली. एरंडोल येथील एका गॅसएजन्सीत काम करणार्या कर्मचार्याने नोकरी सोडल्यानंतर वर्षभर मालकाच्या बँक अकाउंटमधून विविध वस्तू, सोने आदीची ऑनलाइन खरेदी केली आहे. तब्बल 13 लाख 75 हजार 588 रुपयांची खरेदी त्यांनी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी न्यायालयात कामकाज होऊन त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. एरंडोल शहरात अशोक सुपडू पाटील यांची गॅस एजन्सी आहे. पाटील यांच्याकडे तालुक्यातील ब्राह्मणे येथील प्रवीण ऊर्फ भावड्या संभाजी पाटील (वय 27) हा काही वर्षांपासून अकाउंटचे काम पाहत होता.
आरोपीस एजन्सीची सर्व माहिती होती
प्रवीणने 17 सप्टेंबर 2016 रोजी गॅस एजन्सीमधील काम सोडले. त्यानंतर तो घरीच बसला होता. मात्र, प्रवीणकडे गॅस एजन्सीच्या अकाउंटची बँक खाते, पासवर्ड अशी सर्वच माहिती होती. त्याने या माहितीचा गैरवापर करीत सर्वप्रथम बँक खात्यातून पैसे काढल्यावर मालक पाटील यांच्या मोबाइलवर जाणारे मेसेज बंद केले. यात प्रवीणने मे 2017पर्यंत मालक पाटील यांच्या बँक खात्याचा वापर करीत महागडे मोबाइल, सोन्याचे दागिने, बूट, घड्याळ, वॉटर प्युरिफायर, फॅन, एअर प्युरिफायर, दुचाकी अशा एक ना अनेक महागड्या चैनीच्या वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या. पेटीएम, भारत मॅट्रिमनी अॅप्सचाही वापर केला. एजन्सी मालक पाटील यांना मोबाइलवर मेसेज येत नसल्यामुळे कोणत्याच ट्रान्झॅक्शनचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे त्यांनी एप्रिल महिन्यात पाटील यांनी बँक खात्याचे ऑडिट केले असता वर्षभरात 14 लाख रुपये ऑनलाइन पेमेंट कट झाल्याचे समजले. त्यानंतर पाटील यांना प्रवीणवर संशय आल्याने त्यांनी पोलिसांमार्फत प्रवीणची चौकशी केली असता, त्याने कबुली दिली.