नोकरीच्या पहिल्याच दिवशी हेमंतवर काळाचा घाला

0

जळगाव। भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील हेमंत भास्कर दोडे (वय 24) या युवकाला बांभोरी येथील बॉश कंपनीत नोकरी लागली. शुक्रवारी 14 रोजी नोकरीवर हजर होण्याचा त्यांचा पहिलाच दिवस होता. पहिल्या दिवसाचे काम संपवुन तो कंपनीने दिलेला गणवेश आणि बूट घेऊन घराकडे निघाला होता. बांभोरी पूल ओलांडल्यानंतर समोरून येणार्‍या डंपरने युवकाच्या दुचाकीला धडक देऊन त्याला चिरडले. त्याच कंपनीत काम करणार्‍या त्यांच्या सहकार्याने हेमंतला ओळखले. हेमंत कंपनीत हजर होण्यासाठी दुचाकी( एमएच-19-सीबी-8164) गेला होता. तो सकाळी वाजता कामावर हजर झाला. कंपनीत सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास त्याला कंपनीचा गणवेश आणि बूट दिले. हॉटेल गिरणा गार्डन जवळ समोरून भरधाव येणार्‍या अज्ञात डंपरने हेमंतच्या दुचाकीला धडक दिली.

हेमंतचे बीएसएफचे स्वप्न अपूर्णच राहिले
हेमंत खाली पडला त्याच्या डोक्यावरून डंपर चालून गेला. अपघात झाल्यानंतर चालक डंपरसह फरार झाला. अपघातानंतर हेमंतचे मित्र अपघात स्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ नातेवाइकांना फोन करून अपघात झाल्याचे कळवले. त्यानंतर जैन इरिगेशन कंपनीच्या रुग्णवाहिकेने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले. हेमंतचे बीएसएफमध्ये जाण्याचे स्वप्न होते अखेर त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मुलाचा अपघात झाल्याचे कळताच हेमंतचे आई, वडील, भाऊ हे जळगावला येण्यासाठी निघाले. कालिंका माता मंदिरापर्यंत आल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी त्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र, मुलाला बघून परत जातो, असा हट्ट त्यांनी धरला. काही नातेवाइकांनी समजूत काढल्यानंतर त्यांना कालिंका माता मंदिरापासून परत पाठवले. हेमंतचे वडील भास्कर दोडे हे शेतकरी आहेत. तर बहीण पूनम आणि लहान भाऊ लखन हा बारावीत आहे.