आरोपीला न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी : दुसर्या आरोपीची जामिनावर सुटका
भुसावळ- पोस्टात नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून शहरातील किशोर वाघनाथ भालेराव (55, मोहित नगर, गणेश कॉलनीमागे, भुसावळ) यांची तब्बल नऊ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी रेल्वेतील एमओएचमधील टेक्नीशीयन भूषण प्रभाकर इंगळे (32, सुतार गल्ली, भुसावळ) व सुरज रामा तेलगोटे (निगडी, पुणे) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल होता. आरोपी भालेराव यास गुरुवार, 12 रोजी अटक केल्यानंतर त्यास पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती तर मंगळवारी न्यायालयाने आरोपीची जामिनावर सुटका केली तर सोमवारी दुपारी शहर पोलिसांनी पुण्यातून आरोपी सुरज तेलगोटे यास अटक केली. न्यायालयात त्यास हजर केले असता 20 जुलैपर्यंत त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यन, अटकेतील आरोपी तेलगोटे हा स्वतःला पोस्टातील डाकसेवक म्हणवून घेत असलातरी त्याच्या नोकरीविषयी साशंकता असल्याने पोलिसांनी पुणे डाक अधीक्षकांना त्या संदर्भात पत्राद्वारे विचारणा केली आहे.
भुसावळातील आरोपीला घातला गंडा
किशोर भालेराव यांच्या मुलांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने भूषण इंगळे व सुरज तेलगोटे यांनी नऊ लाखात गंडा घातला होता तर या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात 28 सप्टेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला इंगळे यास अटक केल्यानंतर त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यात आरोपी तेलगोटेने भूषण इंगळे यांच्या बहिणीसह साला व चुलत भावाचीदेखील नऊ लाखात फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे.
पुण्यातून आरोपीला केली अटक
शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल पाटील, सोपान पाटील, विशाल मोहे यांनी सोमवारी दुपारी निगडी चिंचवड येथून आरोपी सुरज तेलगोट यास अटक केली. आरोपी स्वतःला पोस्टात डाकसेवक म्हणून नोकरीला असल्याचे सांगत असून सुमारे दिड वर्षांपासून ते कर्तव्यावर गेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांकडून या बाबीची खातरजमा करण्यासाठी पोस्ट अधीक्षकांना पत्र देण्यात आले आहे तर आरोपीस 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.