राजगड : राजस्थानमध्ये बेरोजगारीला कंटाळून चार तरुणांनी ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनोज मीना (वय २४), सत्यनारायणन मीना (वय २२), रितूराज मीना (वय १७) आणि अभिषेक मीना (वय १८) या चौघांनी मंगळवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. नोकरी मिळत नसल्याने चौघेही निराश होते, असे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.अलवार जिल्ह्यातील राजगड- रैनी या गावात हे चौघे राहत होते. या घटनेवरुन राजकारणही सुरु झाले असून काँग्रेसने भाजपावर निशाना साधला आहे. भाजपाने देशातील तरुणांवर ही वेळ आणल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
आत्महत्या करताना त्यांचे मित्र राहुल (वय १८) आणि संतोष (वय १९) हे देखील त्यांच्यासोबत होते. त्यांच्या डोळ्यासमोरच चौघांनी ट्रेनसमोर उडी मारली. राहुल आणि संतोषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते चौघेही नोकरी मिळत नसल्याने निराश होते. त्यांना शेतीचे देखील काम जमत नव्हते. आपण ओझं म्हणून जगतोय, अशी भावना त्यांच्या मनात येत होती. त्या चौघांनी संतोष आणि राहुलला देखील आत्महत्या करणार का असे विचारले. पण त्या दोघांनी त्यांना नकार दिला. ‘आम्ही रेल्वे रुळाजवळ थांबलो होतो. मला भूक लागली होती. आपण घरी जाऊया असं मी त्यांना सांगितले. पण त्यांनी अर्धा तास थांबायला सांगितले. यानंतर चौघेही मोबाईलवरुन कुटुंबीयांना फोन करत होते. थोड्या वेळाने सत्यनारायणनने माझ्याकडे सिगारेट मागितली. सिगारेट ओढत असतानाच ट्रेन आली आणि चौघांनीही ट्रेनसमोर झोकून देत आत्महत्या केली’, असे राहुलने पोलिसांना सांगितले आहे.
चौघांचीही कुटुंबाची परिस्थिती चांगली
रितूराज हा कला शाखेच्या प्रथम वर्षात शिकत होता. तर सत्यनारायणन आणि मनोज हे दोघेही पदवीधर होते. दोघेही स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. तर अभिषेक विज्ञान शाखेतील प्रथम वर्षात नापास झाला होता. रितूराजचे वडील पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल आहेत. तर अभिषेकच्या वडिलांची दुधाची डेअरी आहे. सत्यनारायणनच्या कुटुंबीयांची शेती आहे. चौघांच्याही कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती इतकीही हलाखीची नव्हती. आत्महत्येमागे वेगळे कारणही असू शकते, अशी शक्यता एका पोलीस अधिकाऱ्याने वर्तवली आहे.