राशीब अहमद ; पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात उद्योजकता जागृती शिबिर
भुसावळ- आपले ध्येय नोकरी वा उद्योजक बनण्याचे असो ध्येय मोठे व आव्हानात्मक असले पाहिजे. आपल्यातील सुप्त गुणांचा विचार करून ध्येयाला चिटकून रहा, ध्येय ठरवितांना आई, वडिलांना विश्वासात घ्या, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपले पाय जमिनीवर असले पाहिजे. आपण दिसतो कसे याचा विचार न करता आपण कसे असलो पाहिजे याचा विचार करा त्यासाठी बाह्य बाजुनचा विचार न करता अंतर्गत गुणांचा विचार करा, असे विचार राशीब अहमद (जळगाव) यांनी व्यक्त केले. नाहाटा महाविद्यालयात आयोजित उद्योजकता जागृती शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी समन्वयक डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रा.एस.टी.धूम, प्रा.व्ही.ए.सोळुंके, डॉ.किरण वारके व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रत्येकाला यशस्वी उद्योजक होणे शक्य -जितेंद्र पवार
दुपारच्या सत्रात फैजपूर येथील दत्त इरीगेशनचे जितेंद्र पवार यांनी मी उद्योजक कसा झालो या विषयावर मार्दर्शन केले. त्यात त्यांनी यशस्वी उद्योजक होणे ही कोणाची मक्तेदारी नसून प्रत्येक व्यक्तीला शक्य आहे. फक्त आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे. त्या व्यवसायाची निवड करा, त्यासाठी लागणारी साधन सामुग्री, तिची उपलब्धता, कच्चा माल, कामगार याचा शोध घ्या, पक्क्या मालासाठी कोणती बाजारपेठ उपलब्ध आहे. याचाही विचार करा, असे ते म्हणाले.
आज शिबिराचा समारोप
शनिवार, 9 रोजी या शिबिराचा समारोप होत असून शंकर भावरे हे लघू उद्योग कसा सुरू करावा या विषयावर मार्गदर्शन करतील तसेच यशस्वी उद्योजकांचे अनुभव आशिष इलेक्ट्रिकल जळगावचे संजय इंगळे सांगतील. समारोपास समन्वयक हर्ष तिवारी, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विष्णू चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे उपस्थित राहतील.