नोटबंदी एक आर्थिक भूकंप

0

पुणे । नोटबंदीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. नोटबंदी एक आर्थिक भुकंप आहे़ यामुळे विकासदरामध्ये 2 टक्क्याने घट झाली़ विविध विषयांवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेसने केला आहे़, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितले़ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड अभय छाजेड यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित केलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ़ विश्‍वजीत कदम, कमल व्यवहारे, मोहन जोशी, अमीर शेख, श्रीकांत शिरोळे, रशिद खान, संजय बालगुडे, रोहित टिळक आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

15 लाख बेरोजगार
समाजाच्या संवेदना व आक्रोश पोहचविण्यासाठी व्यंगचित्र अत्यंत प्रभावी माध्यम आहे़ नोटबंदीच्या काळामध्ये अनेक नागरिक मृत्यमुखी पडले़ बँकांच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या़ देशात 15 लाख लोक बेरोजगार झाले आहेत़ शेतकरी-शेतमजूर हवालदिल झाला आहे़ लघुउद्योग व मध्यम उद्योगांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ असंघटीत क्षेत्रामध्ये लाखो लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत, असे ठाकरे यांनी सांगतले. मोदी सरकारच्या नोटबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ 8 नोव्हेंबरला काँग्रेसतर्फे देशव्यापी काळा दिवस पाळला जाणार आहे़ जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे़, असेही त्यांनी पुढे सांगितले.