नोटाबंदीचे राज्यभर वर्षश्राद्ध!

0

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह राजकीय पक्ष, विविध संघटनाही रस्त्यावर उतरल्या

पुणे/मुंबई : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या एक वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना, काँग्रेस पक्षांनी बुधवारी राज्यभर निषेध मोर्चे काढले. मुंबई, पुणे, सातारा, जळगावसह राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये ’काळा दिवस’ही पाळण्यात आला. तसेच नोटाबंदीचे श्राद्ध घालून सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. यानिमित्त अनेकांनी मुंडणही केले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध संघटनांनी केंद्राविरुद्ध रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त केला.

नोटाबंदी ही दुसरी आणीबाणीच असल्याची टीका
मुंबईतील आझाद मैदानावर राष्ट्रवादीकडून निषेध सभा घेण्यात आली. तसेच शहरातील विविध ठिकाणी नोटाबंदीच्या स्मरणार्थ निषेध सभा आणि मोर्चे काढण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, धनंजय मुंडे आदी सहभागी झाले होते. नोटाबंदीमुळे बेरोजगारीचे संकट, असंघटीत व कृषिक्षेत्राची अपरिमित हानी विकासदरात घट असे अनेक प्रश्न आज देशासमोर उभे राहिले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कृषिक्षेत्रावर आणि राज्य अर्थकारणावर झालेल्या चांगल्या वाईट परिणामांची श्वेतपत्रिका काढण्याची हिंमत सरकारने दाखवावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. याचबरोबर पुण्यातदेखील राष्ट्रवादीकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. सरकारने अंदाधुंदी कारभार चालवला असून, नोटाबंदी ही एकप्रकारची आणीबाणीच होती. यामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे, असे मत यावेळी या नेत्यांनी व्यक्त केले. याचबरोबर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या निषेधार्थ सभा आणि मोर्चे आयोजित करण्यात आले होते. जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजकीय पक्षांनी नोटाबंदीचे श्राध्द घालून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.