नवी दिल्ली : नोटाबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का असून नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला, अशा शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे.
अरविंद सुब्रमण्यम यांनी सहा महिन्यांपूर्वीच मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयामुळे एकाच फटक्यात चलनात असलेल्या ८६ टक्के नोटा परत मागवण्यात आल्या. याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर झाला. खरंतर, आधीपासूनच आर्थिक विकास मंदावला होता. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे यात अधिकची भर पडली, असे त्यांनी सांगितले. नोटाबंदीच्या अगोदर विकास दर ८ टक्के होता. पण नोटाबंदीनंतरच्या तिमाहीत विकास दर ६.८ वर घसरला, असे त्यांनी सांगितले.’द टू पझल्स ऑफ डिमोनेटायझेशन- पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक’ या पुस्तकात त्यांनी हे मत मांडले आहे.