एरंडोल : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदीचा निर्णय काळापैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने घेतलेला निर्णय हा योग्य असला तरी मुजोर बँक अधिकार्यांच्या आडमुठे धोरणामुळे बँकेचे ग्राहक हे आपलाच पैसा मिळवण्यासाठी अपमानित होत आहेत व त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी केले. तहसील कार्यालयात ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी सदर मेळाव्यात मनोगत व्यक्त करणारे प्रमुख वक्त्यांनी जनजागृती अभावी व महसूल विभागाच्या नियोजन शून्य कारभारावर नाराजी व्यक्त केली. मेळाव्यात फक्त रेशन दुकानदार, ग्राहक मंचाचे ठराविक सदस्य व तीनच विभागाचे प्रमुख अधिकारी तथा महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
मेळाव्याचे नियोजन शून्य; ग्राहकांची उपस्थितीच नाही
सदर मेळाव्यात मान्यवर हे तक्रारी मांडत असतांना कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व निवासी नायब तहसीलदार आबा महाजन व तहसीलदार सुनिता जर्हाड यांनी हा कार्यक्रम ग्राहक दिन असुन तक्रार दिवस नाही असे सांगितले. परंतु कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी यावेळी ग्राहक दिन हा ग्राहकांच्या समस्या, तक्रारी निवारण्यासाठी, ग्राहकांच्या हक्काच्या जनजागृतीसाठी असल्याचे सांगून धारेवर धरले. सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील, नगराध्यक्षा लक्ष्मीबाई महाजन, सचिन महाजन, कमरअली सैयद, लक्ष्मण ठाकुर, रोहिदास पाटील, भिमराव सोनवणे, कल्पना लोहार, रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बडगुजर, शेख सांडू शेख मोहम्मद, राजु पाटील यांचेसह विक्रेते उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास ग्राहकांची उपस्थिती नसल्यामुळे ग्राहकांपर्यंत कार्यक्रमाची माहिती पोहचविण्यात आयोजकांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.