नोटाबंदी, जीएसटीमुळे सर्वसामान्यांची पिळवणूक- महेश पाटील

0

येरवडा : सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतानाच झालेल्या नोटबंदी व जीएसटीमुळे सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात पिळवणूक झाल्याने अनेक कुटूबांना घर खर्च कशा पद्धतीने भागावयाचा हा मुख्य प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सध्या देशभर मंदीची लाट पसरल्याने व्यापारी वर्गात देखील नाराजीचे सूर उमटले आहेत. यामुळे तरुण वर्गात बेरोजगारीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मत राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष महेश पाटील यांनी व्यक्त केले.

मदर तेरेसा मतिमंद महिलांचे आश्रम येथे युनियनचे संस्थापक व कामगार नेते उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद महिलांना फळांचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रसाद तनपुरे,श्रीकांत कोपुलवार,गिरीश ढाके,शशी निकाळजे,नितेंना इंगळे,तुफेल माणिकवाला,जावेद इनामदार,बाळासाहेब चाबुकस्वार,सुनीलघोडके,बादशाह व्यापारी,दत्ता दौंडकर,राजू भालशंकर,दीपक भोसले,जाफर खान,रोहित राठोड,विजय राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रसाद तनपुरे,जावेद इनामदार यांनी मानले.

राजकारण न करता समाजकारण
पाटील म्हणाले की,कामगार नेते यांनी सर्वसामान्य जनतेचा मुख्य समस्या लक्षात घेऊन पक्षाच्या माध्यमातून युनियनची स्थापना केल्यामुळे आज पुणे जिल्ह्यात जवळपास 5 हजाराहून अधिक कामगार खाजगी व शासकीय कंपन्यांमध्ये कार्यरत असल्यानेच अनेक कुटुंबांना एक वेळचे पोटभर अन्न मिळत आहे. तर संपूर्ण राज्यभर जवळपास 1 लाखापर्यंत कामगार कार्यरत असून राष्ट्रवादी पक्ष जातीचे राजकारण न करता समाजकार्यातून लोकांचे प्रश्‍न कशा पद्धतीने मार्गी लावता येईल याकरिता प्रयत्नशील आहे.

जनतेला बुरेदिन पाहण्याची वेळ
पाटील म्हणाले ,देशातील जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या जनतेला बुरेदिन पाहण्याची वेळ आली आहे. कारण मागील विधानसभा निवडणुकीमध्ये देशातील प्रत्येक बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देशाचे आश्‍वासन भाजप सरकारने दिले होते. मात्र गेल्या चार वर्षात किती बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असा संतप्त सवाल पाटील यांनी केला. आज कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असून राज्यातील शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची वेळ येत असेल तर यासारखी दुर्दैवी घटना कोणती असू शकते.