नोटाबंदी वर्षपूर्तीनंतरही ‘भीम आधार पेमेंट सिस्टीम’ कागदावरच

0

पुणे । नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटवर भर देण्यात आला होता. डेबिट, क्रेडिट कार्डधारकांना ही सुविधा उपलब्ध होतीच. मात्र, ज्यांच्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नाही आणि ज्यांच्याकडे मोबाइलही नाही, अशांना केवळ अंगठ्याच्या ठश्याच्या आधारे ‘कॅशलेस’ व्यवहार करता येणार होते. मात्र, नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतरही ‘भीम आधार पेमेंट सिस्टीम’ कागदावरच राहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ‘भीम’ अ‍ॅप सादर केले होते. या अ‍ॅपच्या आधारेच ‘भीम आधार’ ही पेमेंट सुविधा सर्वांना उपलब्ध होणार होती. पेपरलेस बँकिंग ही संकल्पना आता देशभरात रुजवायची आहे. येत्या काळात व्यवहार करण्यासाठी स्मार्टकार्डचीही गरज भासणार नाही. मोबाइल नसला तरी अंगठ्याने व्यवहार करता येणार आहे. पूर्वी अशिक्षित लोकांची निशाणी म्हणून अंगठ्याचा वापर केला जात होता. आता अंगठा शक्तीचे केंद्र बनत आहे. पीओएस किंवा त्यापेक्षाही छोट्या मशिन्सच्या साह्याने अंगठ्याच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. आधार कार्डमुळे हे शक्य झाले आहे, असे मोदी यांनी त्या वेळी सांगितले होते. मात्र, अजूनही ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही.

ग्रामीण भागातील परिस्थिती याहून बिकट
या यंत्रणेचा आधार हा आधार क्रमांक हा आहे. अजूनही कित्येक नागरिकांकडे आधार क्रमांक नाही. आधारसाठी नोंदणीची मशिनच बहुसंख्य ठिकाणी उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी असलेली मशिन बंद आहेत. आधार क्रमांक काढण्यासाठी लोकांना सर्वत्र शोध घ्यावा लागत आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे, अशांपैकी अनेकांनी आपल्या खात्याशी आधार क्रमांक जोडलेला नाही. ग्रामीण भागातील परिस्थिती याहून बिकट आहे,’ अशी माहिती राष्ट्रीयीकृत बँकांमधील सूत्रांनी दिली.

तंत्रज्ञान विकसित नाही
‘सध्या बँकांकडून बँक खात्यांशी आधार क्रमांक जोडण्याची मोहीम राबवली जात आहे. त्याला पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. नव्याने आधार नोंदणीत अडचणी येत आहेत. त्याचबरोबर आधार-पे सिस्टीमसाठीचे तंत्रज्ञान पुरेसे विकसित झालेले नाही. त्यात काही अडचणी येत आहेत.

आधार खात्याशी जोडणे आवश्यक
या यंत्रणेसाठी प्रत्येकाचा आधार कार्ड नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. खातेदाराचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला असेल, तर ‘आधार-पे’च्या मदतीने केवळ संबंधित छोट्या मशिनवर अंगठ्याचा ठसा देऊन पेमेंट करता येऊ शकते.