न्यायव्यवस्था हतबल होणे देशासाठी चिंताजनक

0

हडपसर । देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था हतबल झाल्याचे देशवासीयांनी बघितले. न्यायव्यवस्थेचा कसा वापर केला जातो हे संपूर्ण देशाने पाहिले आहे, हे चिंताजनक आहे. याचा गांभीर्याने विचार करून याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा देशवासियांचा भ्रमनिरास होईल, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पुण्यात हडपसर येथील समता नागरी सहकारी पतसंस्था आणि नगरसेवक योगेश ससाणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. ‘न्यायव्यवस्था वाद सोडविण्यासाठी असते. लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. सव्वाशे कोटी जनतेचा ज्यांच्यावर विश्‍वास आहे अशी न्यायव्यवस्थाच हतबल झालेली आहे. असा प्रसंग पुन्हा कधी यायला नको यासाठी तातडीने उपाययोजना करायला हव्यात, अशी अपेक्षा अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

पवार यांचा सत्कार
सावली फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले व चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी पालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी आमदार जग्गनाथ शेवाळे, विक्रम शेवाळे, दत्तोबा ससाणे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, निलेश मगर, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, हेमलता मगर, विजय मोरे, अतुल तरवडे, रईस सुंडके, दिलीप गायकवाड, शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर, अजिंक्य घुले, प्रदीप कंद, नगरसेविका उज्वला जंगले आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात सावलीचे अध्यक्ष नगरसेवक योगेश ससाणे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. अजित पवार यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला.

चुकीच्या गोष्टींना आळा घाला
सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी मोठे कार्य उभा केले आहे, समाजाच्या भल्याचे कार्यक्रम घेण्यास नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, शंभू राजांना बदनाम करण्याचे काम समाजतील विकृत माणसांनी केले आहे, कोरेगाव भीमा येथे जी घटना घडली तेथे समाजात दुही निर्माण करण्याचे काम करतात कोरेगाव भीमा घटनेमागचा सूत्रधार शोधून काढला पाहिजे, चुकीच्या गोष्टी तरुणांमध्ये रुजवायच्या याला वेळीच आळा घातला पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.

बँका अडचणीत
राज्यातील बँका आणि सहकारी क्षेत्रासमोर मागील काही दिवसांपासून अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही चिंतेची बाब आहे. हे सरकार छोट्या बँका संपवून काही निवडक बँकामध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा डाव आखत आहे. नोटाबंदीचा निर्णय सांगून थकलो पण माझं कोणी ऐकलं नाही. याचा सर्व सामान्य नागरिकांच्या जीवन मनावर परिणाम झाला असून या मागील उद्देश साध्य झाला का नाही, हे पण सांगण्यास हे भाजप सरकार तयार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. अद्यापपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 500 आणि हजाराच्या नोटा आहेत. त्याच व्याज वाढत आहे. यामुळे सहकारी बँका अडचणीमध्ये सापडल्या आहेत. मनोवादी प्रवृत्ती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत आहे. अशावर सरकार कारवाई करण्याची गरज आहे. देशातील ज्या व्यवस्थेवर विश्‍वास आहे. त्याच व्यवस्थेतील प्रमुखांना पुढे येऊन बोलावे लागत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.