भुजबळांना मिळालेल्या जामिनाचे स्वागत
पिंपरी : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळ यांना जामीन मंजूर केला आहे. तर छगन भुजबळांना मिळालेल्या जामिनाचे स्वागतच आहे. न्यायसंस्थेवर विश्वास आहे. न्यायालयाने योग्य तो निर्णय घेतलाय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी व्यक्त केले आहे.
पक्षाची, जनतेची साथ
अमित बच्छाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली दोन वर्षे छगन भुजबळांना तुरुंगवास भोगावा लागला. परंतु भुजबळांवरील जनतेचा विश्वास अढळ होता. या कालावधीमध्ये राष्ट्रवादी पक्षानेही त्यांची साथ सोडली नाही. सातत्याने भुजबळांच्या सुख दुखा:त खंबीरपणे उभा राहिल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. एक अभ्यासू, प्रभावी जनतेच्या न्याय हक्कांसाठी नेहमी तत्पर असणारे भुजबळ सबंध महाराष्ट्राने पाहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ताकाळात नेहमीच महाराष्ट्र विकासाला प्राधान्य दिले आहे.
परंतु, भाजपने जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवित सत्ता मिळविली, सत्ता मिळाल्यानंतर भाजपकडून विकास अपेक्षित होता. याउलट सत्तेचा गैरवापर करीत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बेछूट आरोप करीत आहे. राजकीय सुडापोटी भुजबळांसारख्या व्यक्तिमत्वाला विविध प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे. आगामी काळात राजकीय षडयंत्रापोटी भुजबळांना गोवण्यात आलेल्या प्रकरणातून ते निर्दोषपणाने मुक्त होतील, असा विश्वास बच्छाव यांनी व्यक्त केला आहे.